संतोष गायकवाड
वाघोली : पुण्याच्या वाघोलीतील केसनंद फाटा परिसरात घरफोडी करणाऱ्या चोरट्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून घरफोडीतील २ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकाने सोमवारी (दि. २५) केली.
मोहम्मद शाद मोहम्मद शाहिद अन्सारी (वय 18, रा. काळूबाईनगर, वाघोली, पुणे, मूळ- मोहल्ला सत्यान, तालुका बढापूर, जि. बिजनौर, उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी गुन्हे शाखा युनिट ६ चे अधिकारी पेट्रोलिंग करत असताना घरफोडीतील आरोपी वाघोतील उभा असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली. त्यानुसार, सापळा रचून पोलिसांनी मोहम्मद शाद मोहम्मद शाहिद अन्सारी या तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता रविवारी (दि. २४) पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास वाघोतील केसनंद फाटा येथील स्टार डायग्नोस्टिक सेंटरमधील रुममध्ये उघड्या दरवाजावाटे आत प्रवेश करुन मोबाईल चोरल्याची कबूली त्याने दिला.
पोलिसांनी चोरट्याला अटक करून त्याच्याकडील सॅमसंग व मोटोरोला कंपनीचे एकूण ०२ मोबाईल जप्त केले आहेत. तसेच लोणीकंद पोलिस ठाण्यातील हा गुन्हा उघडकीस आला आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी लोणीकंद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी गुन्हे शाखेचे अपर पोलीस उप आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उप आयुक्त अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त सतीश गोवेकर या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, पोलिस हवालदार रमेश मेमाने, पोलिस नाईक प्रतिक लाहीगुडे, पोलिस अंमलदार ऋषीकेश व्यवहारे, नितीन धाडगे पथकाने केली.