बीड : बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील आलापूर येथे पत्र्याच्या शेडला अचानक आग लागली. त्यात घरामध्ये असलेल्या एका अंधवृद्धाचा होरपळून दुर्दैव मृत्यू झाला. रामभाऊ शहाणे असे अंध वृद्धाचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच दिंद्रुड पोलीस आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला आहे.

आलापूर येथील रामभाऊ शहाणे आणि रुक्मिणीबाई शहाणे हे दांपत्य गावात एका पत्राच्या शेडमध्ये राहत होते. रुक्मिणीबाई या शेतात कापूस वेचण्यासाठी गेल्या होत्या तर अंध असलेले रामभाऊ हे आजारी असल्याने ते घरातच झोपून होते. मात्र दुपारच्या वेळी अचानक त्यांच्या शेडमध्ये आग लागली आणि काही वेळातच आग एवढी पसरली की संपूर्ण घर आगीच्या भक्षस्थानी गेलं.

गावकऱ्यांना आगीची माहिती मिळताच तात्काळ आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले, मात्र खूप उशीर झाला होता. त्यामुळे आग विझवण्यापूर्वीच त्यांचा शेडमध्ये मृत्यू झाला. घरामध्ये दुसऱ्या खोलीत असलेल्या गॅस सिलेंडरपर्यंत आग पोहोचण्याअगोदरच गावकऱ्यांनी ही आग विझवली. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला.







