पुणे: हडपसर पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. अभिषेक उर्फ नयन हरिदास भोसले (वय -१९ वर्षे, रा. शेख जिवनबापू चाळ जवळ, स्मशानभूमी रोड, शेवाळवाडी, पुणे) असे कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. याबाबत पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आदेश पारित केला आहे.
अभिषेक भोसले हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चाकु, लोखंडी कोयता या सारख्या जीवघेण्या घातक हत्यारांसह दुखापतीसह जबरी चोरी, जबरी चोरी, खंडणी, दुखापत, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षांमध्ये त्याच्या विरुद्ध पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल, या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यासाठी धजावत नव्हते.
अभिषेक भोसले याच्यावर कारवाई करण्यासाठी हडपसर पोलीस ठाण्याकडून पुणे आयुक्त यांना प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यानंतर प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी अभिषेक भोसले याला एमपीडीए कायद्यान्वये नागपुर मध्यवर्ती कारागृह, नागपुर येथे एक वर्षाकरीता स्थानबध्द करण्याचे आदेश पारीत केले आहेत. भोसले यास स्थानबध्द करण्यामध्ये हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके, पीसीबी गुन्हे शाखाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांच्या आधिपत्याखाली पोलीस आधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सदरची कामगिरी पार पाडली.
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यांनी या वर्षामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेच्या ७६ कारवाया केल्या आहेत. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.