सासवड : आज क्रांती दिनी पुरंदर तालुक्यात उभारलेल्या ऐतिहासिक १०० दिवशीय आंदोलनास ६ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यावेळी सर्वत्र महाराष्ट्रात आंदोलन झाली. या अनुषंगाने क्रांती दिनानिमित्त शहिद हुतात्मा यांना अभिवादन कारण्यात आले. यानिमित्त सकल मराठा क्रांती मोर्चा पुरंदर, आखिल भारतीय मराठा महासंघ पुरंदर यांच्या वातीने आज छत्रपती शिवाजी महाराज शिवतीर्थ चौक सासवड येथे अभिवादन करण्यात आले.
यावेळी मराठा क्रांती मोर्चा पुरंदर तालुका वतीने मराठा समाजाला ओबीसी मधून 50% च्या आत आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली रविवार ११ ऑगस्ट २०२४ रोजी पुणे येथे होणाऱ्या शांतता रॅलीत पुरंदर तालुक्यातून लाखो संख्येने मराठा बांधव उपस्थित राहणार असल्याचा निर्धार अखंड मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला.
मनोज जरांगे पाटील यांच्या जनजागृती व शांतता रॅलीनिमित्त पुरंदर तालुक्यातून चार चाकी आणि दुचाकी घेऊन दिवे घाट आणि बापदेव घाट मार्गे पुणे सारसबाग येथे सर्व मराठा बांधव भगवा ध्वज आणि भगवी टोपी परिधान करून उपस्थीत राहणार आहेत. रविवारी ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता शिवतीर्थ सासवड येथून छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून रॅली निघणार आहे. यावेळी तृप्ती कोलते, साक्षी खेसे, दीपक जगताप, सदानंद जगताप, अभिजीत जगताप, विकास कामथे, नंदूबापू जगताप, सागर जगताप, अमोल कड, स्वप्निल गायकवाड, दीपक फडतरे, अभिजित धुमाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.