पुणे : पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डात डमी आडत्याने एका वयोवृद्ध शेतकऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले असून, या घटनेचा निषेध केला जात आहे. या घटनेनंतर आता संचालक मंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, बाजार समितीत मंगळवारपासून बेकायदा आणि डमी आडत्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आदिनाथ गायकवाड (रा. करंजी, ता. पाथर्डी, जिल्हा नगर) असे मारहाण झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सुरेश भोहिने असे मारहाण करणाऱ्या डमी आडत्याचे नाव आहे. नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी गावातील शेतकरी आदिनाथ गायकवाड संत्रीसह मोसंबीचीही बाग आहे. शुक्रवारी एका आडत्याकडे 108 क्रेट्स संत्री विक्रीस आणली होती. मोसंबीदेखील बाजारात विक्रीस आणायची होती. त्यामुळे मोसंबीला किती भाव मिळत आहे, याची चौकशी करायला गायकवाड हे एका आडत्याच्या गाळ्यावर गेले. तेथे ते चर्चा करत असताना पाठीमागे उभा असलेल्या डमी आडत्या सुरेश भोहिने याने (चवली दलाल) त्यांना पाठीमागून लाथ घातली. तसेच कानशिलातही लगावली.
या मारहाणीचा व्हिडिओ माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी त्यांच्या फेसबुक या सोशल मीडियावर अपलोड केला असून, मारहाण करणाऱ्या अशा गुंडांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता या सर्व प्रकारानंतर गाळ्यावरील डमी आणि गाळ्या समोरील 15 फुटाच्या बाहेरील वापरण्यात येणार्या जागांवर देखील कारवाई केली जाणार असल्याचे सभापती दिलीप काळभोर, सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी सांगितले.
270 कोटींचा विकास आराखडा शासनाला सादर
पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या परिसराचा वाढता विस्तार पाहता या दोन्ही शहरांभोवतीच्या महामार्गालगत उपबाजार उभारणीची प्रक्रिया सुरू आहे. कोरेगाव मुळ 11 एकर जागा, खेड शिवापूर 5 एकर, उत्तमनगर 4 एकर, पेरणे 10 एकर या ठिकाणांचा विकास आराखडा केला जात आहे. मोशी येथील उपबाजारातील सात एकरवर 270 कोटी रूपयांचा विकास आराखडा शासनाला सादर केला आहे.
– दिलीप काळभोर, सभापती, पुणे बाजार समिती