राहुलकुमार अवचट
यवत : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कासुर्डी टोलनाक्यावरील शेड तत्काळ हटवावे, या मथळ्याखाली दैनिक ‘पुणे प्राईम’मध्ये दोन दिवसांपूर्वी बातमी प्रसिद्ध झाली होती. भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाच्या पुणे कार्यालयाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी याची तातडीने दखल घेऊन, बंद झालेल्या कासुर्डी टोल नाक्यावरील महामार्गावर अडथळा ठरणारी केबिन त्वरीत काढून टाकली आहे. रस्ता मोकळा झालीने प्रवाशी व नागरिकांनी दैनिक पुणे प्राईमचे व अधिकारी संजय कदम यांचे आभार व्यक्त केले.
दैनिक ‘पुणे प्राईम’ने दिलेल्या बातमीच्या आधारे शिवसंग्रामचे पुणे जिल्हाध्यक्ष वसंतराव साळुंखे यांनी दै. ‘पुणे प्राईम’चे व राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाचे आभार व्यक्त केले. बंद टोलमुळे या ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. ते वेळीच बुजवले जात नाहीत, त्यामुळे याठिकाणी सतत अपघात होतात. येथे अनावश्यक गतिरोधक असून, तेही काढलेले नसल्याने वाहनांचे नुकसान होत आहे. बंद पडलेल्या टोल नाक्यावरील शेड काढून टाकण्यात यावे व त्याठिकाणचे खड्डे बुजवून हा रस्ता वाहतुकीसाठी तयार करावा, असा पाठपुरावा ‘एनएचएआय’कडे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.