उरुळी कांचन (पुणे) : मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी पुणे-सोलापूर रोड येथील नर्सरी व्यवसायिकांकडून 3 लाख रुपये रोख रक्कम मदत देण्यात आली आहे. बीडवरून पुण्याच्या दिशेने निघालेल्या देशमुख कुटुंबियांना पुणे-सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील श्री बालाजी नर्सरी येथे बुधवारी (ता. 23) दुपारी नर्सरी व्यवसायिकांकडून हि आर्थिक मदत करण्यात आली.
9 डिसेंबर रोजी मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. या हत्येमुळे देशमुख कुटुंबातील कर्ता-धर्ता गेल्याने कुटुंबीयांवर मोठं संकट कोसळलं आहे. या कुटुंबीयांस आधार देण्यासाठी जिल्ह्यातून, समाजातून लोकं पुढे येत आहेत. त्यातच पुणे-सोलापूर रोड येथील नर्सरी बांधवांनी दाखवलेला मनाचा मोठेपणा आणि मदतीचा हात, यातून जमा झालेला तीन लाख रुपयांचा निधी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, मुलगी वैभवी देशमुख, मुलगा विराज देशमुख यांना सुपूर्त करण्यात आला.
यावेळी संतोष शितोळे, रामदास कुंजीर, बापू सुरवसे, शशिकांत चौधरी, दिलीप शितोळे, भाऊ जगताप, नितीन घुले, बापू आंबेकर, सचिन आंबेकर, रमेश चौधरी, राहुल निगडे, नवनाथ सावंत, राहुल जगताप व शोभाताई झांबरे व नर्सरी बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते. दरम्यान, कोरेगाव मूळ येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप शितोळे यांच्या घरी देशमुख कुटुंबियांनी भेट दिली.
सरकारकडे देशमुख कुटुंबासाठी न्याय तर मागूच, पण संकटात सापडलेल्या या कुटुंबाला आर्थिक आधार देऊ, असा निर्धार पुणे-सोलापूर रोड येथील नर्सरी बांधवांनी त्यावेळी केला होता. त्यानंतर त्यांनी सढळ मदतीचे आवाहन केल्यानंतर नर्सरी बांधवांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. तब्बल 3 लाख रुपये जमा झाले. यावेळी सर्व नर्सरी बांधवांनी एकत्र येत देशमुख कुटुंबीयांकडे हि आर्थिक मदत सुपूर्त केली. माणुसकीचे नाते दृढ करण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबविला असल्याचे उपस्थित असलेल्या काही व्यावसायिकांनी सांगितले.
याबाबत बोलताना स्वर्गवासिय सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख म्हणाले, “झालेली घटनेची वारंवार चर्चा करण्यापेक्षा आठवण करण्यापेक्षा त्यांना जिवंत कशाप्रकारे करता येईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. संतोष आण्णा यांना देवराई संस्थेकडून पुरस्कार देण्यात आला होता. या वेळी संतोष आण्णांनी दोन हजार झाडे लावून त्याचे संगोपन करण्याचे निश्चित केले होते. त्यामुळे तुम्ही त्यांच्या आठवणी जपण्यासाठी आपणही आम्हाला झाडे देऊन त्यांच्या आठवणी जिवंत ठेवण्यासाठी मदत करा. असे आवाहन धनंजय देशमुख यांनी केले आहे.”
दरम्यान, नर्सरी व्यवसायिकांकडून धनंजय देशमुख यांना जून महिन्यात कितीही झाडे लागतील याची माहिती जाणून घेऊन तुम्हाला जेवढी लागतील तेवढी झाडे देण्यात येतील असे आश्वासन यावेळी देण्यात आले.