पुणे : पुण्यात झिका रुग्णांमध्ये वाढ झाली असून, आता ही रुग्ण संख्या दहावर पोहचली आहे. शहरात झिकाची लागण तीन गर्भवती महिलांना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तीनही महिलांचे अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आले आहेत. दहा रुग्णांपैकी गर्भवती महिलांची संख्या पाचवर गेली आहे. तीन गर्भवतींना लागण झालेल्यांमध्ये आंबेगाव बुद्रुक येथील २७ वर्षीय गर्भवती, पाषाण येथील २८ वर्षीय गर्भवती आणि मुंढवा येथील ३३ वर्षीय गर्भवती महिलांचा समावेश आहे.
दरम्यान, मुंढव्यातील ३३ वर्षीय आठ आठवड्यांच्या गर्भवतीला कोणतीही लक्षणे नव्हती. संशयित म्हणून तिच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते, तिचा अहवाल शुक्रवारी झिकासाठी पॉझिटिव्ह आला. आता तिची तब्येत व्यवस्थित आहे. तसेच पाषाण येथील २३ आठवड्यांच्या २८ वर्षीय गर्भवतीला ३० जून रोजी ताप, लाल चट्टे, सांधेदुखी असा त्रास दिसून आला होता. त्याचबरोबर सिंहगड रस्त्यावरील आंबेगाव बुद्रुक येथे १२ आठवड्यांच्या व २७ वर्षीय गर्भवतीला ३ जुलै रोजी डोकेदुखीची लक्षणे जाणवत होती.
या दोन्ही महिलांचे अहवाल शुक्रवारी एनआयव्हीसाठी पॉझिटिव्ह आले असून, त्यांची तब्येतही स्थिर आहे, अशी माहिती महापालिकेच्या प्रभारी आरोग्यप्रमुख डॉ. कल्पना बळीवंत यांनी दिली आहे.
आरोग्य विभागाची सोमवारी बैठक
झिका संसर्ग बाधित भागात महानगर पालिका लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना करत आहेत. याबाबत महानगर पालिकेचा आरोग्य विभाग सोमवारी एक बैठक घेणार आहे. ग्रामीण भागात एक प्रकरण आढळून आले असून संसर्गाच्या धर्तीवर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.