पुणे : अयोध्येत २२ जानेवारीला राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानंतर मंदिर भाविकांसाठी सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येला जाण्यासाठी विशेष गाड्या सोडण्याची मागणी राम भक्तांकडून केली जात होती. भाविकांची मागणी विचारात रेल्वे प्रशासनाने पुण्यातून अयोध्येसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ३० जानेवारीपासून १५ विशेष रेल्वे गाड्या अयोध्येसाठी पुण्यातून सोडण्यात येणार असून, दोन दिवसातून एक गाडी पुण्यातून अयोध्येसाठी सुटणार आहे. यामुळे रामभक्तांची अयोध्या वारी आता सोपी होणार आहे.
रेल्वे बोर्डाने पुण्यातून ३० जानेवारीपासून ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत १५ विशेष रेल्वे अयोध्येसाठी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एका गाडीमध्ये साधारण दीड हजार प्रवासी अयोध्येला जाऊ शकणार आहेत. यामुळे रामभक्तांनी आनंद व्यक्त केला.
दरम्यान, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातून महत्त्वाच्या व्यक्तींना सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. राज्यातील राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच मनसे प्रमुख राज ठाकरे यांना देखील या सोहळ्याचे निमंत्रण न्यासाकडून मिळाले आहे. शरद पवार राम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर रामलल्लाच्या दर्शनासाठी जाणार असल्याचे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. तर उद्धव ठाकरे अयोध्येत जाणार नाहीत. ते नाशिकमधील काळाराम मंदिरात जाऊन रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. त्यापूर्वी २१ जानेवारीला उद्धव ठाकरे शिवनेरी दौऱ्यावर जाणार आहेत. शिवनेरी गडावर जाऊन तिथली माती कलशात भरुन काळाराम मंदिरात घेऊन येणार आहे. २२ जानेवारीला काळाराम मंदिरात उद्धव ठाकरे रामाची आरती करणार आहेत. तसेच गोदावरी काठी आरती करणार आहेत. या वेळी शिवनेरी गडावरची माती गोदावरीमध्ये सोडणार आहेत. तसेच २३ जानेवारीला नाशिकमध्ये पदाधिकारी मेळावा घेणार आहेत.