पिंपरी : विधानसभा निवडणूक प्रचार खर्च मुदतीमध्ये सादर न केल्याने उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने नोटिसा बजावल्या आहेत. प्रचारासाठी खर्च बँक खात्यातून न केल्याने या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. निवडणूक खर्चाच्या हिशोबाची तपासणी तीन टप्प्यात करण्यात येत आहे. त्यातील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. त्यात अनेक उमेदवारांकडून सादर केलेल्या ज्ञात त्रुटी आढळून आल्या. बँक खर्चातून निवडणूक खर्च न करणे. इंधनावर झालेला खर्च न दर्शविणे, असे प्रकार आढळले आहेत.
भोसरी मतदारसंघात बँक खात्यातून खर्च न केल्याचे आढळून आले आहे. मतदारसंघात ११ उमेदवार आहेत. त्यामुळे बलराज कटके, अमजद खान, जावेद शहा, अरूण पवार, खुदबुद्दीन होबळे, गोविंद चुनचुने, हरिश डोळस, रफिक कुरेशी, शलाका कोंढावार या अपक्ष उमेदवारांना नोटीस बजावली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अजित गव्हाणेंनी स्वतःच्या वाहनावरील इंधनाच्या खर्चाबाबत दैनंदिन नोंद केलेली नसल्याने त्यांना नोटीस देण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रेवणनाथ लबडे यांनी दिली.