नवी दिल्ली : महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिरूर मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे, भाजपच्या सुकांता मजुमदार आणि शिवसेनेचे श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्यासह लोकसभेच्या पाच सदस्यांची यंदाच्या संसदरत्न पुरस्कारासाठी निवड झाली आहे. काँग्रेसचे कुलदीप राय शर्मा आणि भाजपचे सुधीर गुप्ता यांनाही पुरस्कार मिळाला आहे. संसद महारत्न आणि अन्य पुरस्कारही समितीने जाहीर केले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील बारामती मतदारसंघातील खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे यांनाही पुरस्कार जाहीर झाले आहेत. फेब्रुवारी महिन्यात त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.
संसदेत सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या संसद सदस्यांना त्यांच्या कामगिरीच्या आधारे दरवर्षी संसद रत्न पुरस्कार प्रदान केले जातात. चेन्नई आधारित प्राइम पॉइंट फाऊंडेशनने भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेनुसार या पुरस्काराची स्थापना केली आहे. केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल, माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एस. कृष्णमूर्ती यांच्या अध्यक्षतेखालील प्रतिष्ठित ज्युरी समितीद्वारे पुरस्कार विजेत्या खासदारांची निवड केली जाते. भारतातील सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या संसद सदस्यांना सन्मानित करण्यासाठी नागरी समाजाकडून दिला जाणारा हा एकमेव पुरस्कार आहे.
सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र), श्रीरंग अप्पा बारणे (शिवसेना, महाराष्ट्र) आणि भर्तृहरी महताब (बीजेडी, ओडिशा) यांच्या मागील सातत्यपूर्ण अव्वल कामगिरीची दखल घेत, ज्युरी समितीने १७ व्या लोकसभेतही त्यांच्या अनुकरणीय कामगिरीबद्दल त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आणि या तीन खासदारांना संसद उत्कृष्ठ मानरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
संसदीय समित्यांचे महत्त्व लक्षात घेऊन सध्याच्या १७व्या लोकसभेपासून सुरू होणाऱ्या संसद महारत्न पुरस्कारांसाठी तीन स्थायी समित्यांचीही निवड करण्यात आली आहे. पी. सी. गड्डी गौडर (भाजप, कर्नाटक) यांच्या अध्यक्षतेखालील कृषी समिती, जयंत सिन्हा (भाजप, झारखंड) यांच्या अध्यक्षतेखालील वित्त समिती आणि विजयसाई रेड्डी (वायएसआर काँग्रेस, आंध्र प्रदेश) यांच्या अध्यक्षतेखालील परिवहन आणि पर्यटन समिती या समित्यांची त्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.