पुणे: महाराष्ट्र केसरी स्पर्धा म्हणजे पैलवानांसाठी कुस्तीचा कुंभमेळा. महाराष्ट्रातील सर्वात कुस्तीची प्रतिष्ठेची लढाई म्हणून याकडे स्पर्धेकडे पाहिलं जातं. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही येत्या 4 ते 9 नोव्हेंबर दरम्यान पुणे येथे होत आहे. गेली अनेक वर्षे कुस्तीचं नेतृत्व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद शरद पवार यांच्याकडे राहिले आहे. मात्र, आता कुस्ती क्षेत्रात खासदार शरद पवार यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याचं पहायला मिळत आहे. कारण यंदा पुण्यात होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून शरद पवार यांनी नव्हे, तर भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्याला आमंत्रित करण्यात आलं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात कुस्तीगीर संघटनेतही गट-तट निर्माण झालेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांना या स्पर्धेचे निमंत्रण देण्यात येणार नसल्याचं समोर येत आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही पुणे शहरातील वाघोली येथे होईल. परंतु, पवार या वेळी प्रमुख पाहुणे नसतील. यंदा महाराष्ट्र केसरी स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित असणार आहेत.
केंद्रात आणि राज्यात सत्ता आल्यानंतर भाजपने आपला सवता सुभा निर्माण करत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ ही स्वतंत्र संघटना निर्माण केली. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि खासदार रामदास तडस हे त्याचे अध्यक्ष आहेत.यामुळे आता भाजपने कुस्तीच्या मैदानात देखील शरद पवारांना शह दिलाय, अशी जोरदार चर्चा सध्या होताना दिसत आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील वाघोली लोणीकंदजवळ फुलगाव येथे नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेच्या मैदानावर या स्पर्धा पार पडणार आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्र केसरी स्पर्धेची रंगत आणखीच वाढल्याचं पहायला मिळत आहे. कुस्तीच्या मैदानाबरोबरच राजकारणाच्या मैदानात देखील महाराष्ट्र केसरीमुळे वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून येतंय.