पुणे : शिरूर तालुक्यातील करडे पाचर्णेवस्ती येथील एका तरुणाला स्थानिक शिरूर पोलिसांकडून दमदाटी होत आहे. त्यामुळे त्याने थेट न्याय मिळण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे. तसेच न्याय न मिळाल्यास पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करून आत्मदहन करण्याचा इशारा देखील त्याने दिला आहे. गोविंद आबासाहेव वाघमारे असं तरुणाचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गोविंद वाघमारे याची शिरूर पाचर्णेवस्ती येथे जमीन गट नं ९८५/२/१ मध्ये पत्रा घर बांधलेले आहे. २१ जुलै रोजी नितीन मच्छिंद्र पाचर्णे व अनिल यमाजी पोटावळे यांसह पंधरा ते वीस व्यक्तींनी सदर घरातील कामगार अतुल चांदने व युनुस भोसले यांना दमदाटी करत मारहाण करून संपुर्ण घर जेसीबीच्या सहाय्याने उध्वस्त केले. यावेळी त्याने ११२ ला कॉल केल्यावर शिरूर पोलिस स्टेशनचे गणेश पालवे घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत सदर व्यक्ती घर उध्वस्त करून निघून गेले होते.
याबाबत गोविंद वाघमारे शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिस ठाणे आमलदार यांनी ‘पी आय साहेबांना भेटा’ त्यानंतर तुमची तक्रार घेऊ असे सांगून तक्रार घेतली नाही. वाघमारे यांनी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तीन दिवस झाले तरी भेट होत नसल्याने रांजणगावातील डीवायएसपी यांना भेटून सर्व हकीकत सांगितल्याने डीवायएसपी साहेबांनी ज्योतीराम गुंजवटे यांना संबंधीतावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला.
त्यानंतर शिरूर पोलिसांनी फक्त एन.सी. दाखल करून घेतली. याबाबत त्यांना विचारणा केली असता, पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे साहेब म्हणाले, तु कोण हे ठरवणारा? जास्त शहानपाणा करू नको, नाहीतर तुझ्यावर गुन्हा दाखल करीन, अशी धमकी दिल्याचे वाघमारे यांनी अर्जात नमूद केले आहे.
View this post on Instagram
तसेच घर पाडणा-या व्यक्तींना राजकीय वरदहस्त असल्याने पोलिस त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप गोविंद वाघमारे यांनी केला आहे. संबंधीत व्यक्तींवर योग्य गुन्हा दाखल करावा व मला न्याय मिळावा. तसेच दिरंगाई करण्याऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाई करावी, अन्यथा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करून आत्मदहन करण्याचा इशारा गोविंद वाघमारे यांनी दिला आहे. एवढंच नाही तर सर्व जवाबदारी पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांची राहील, अशी लेखी तक्रार पत्राद्वारे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.