उरुळी कांचन, (पुणे) : मागील काही दिवसांपासून उरुळी कांचनसह परिसरात मटका, जुगार, देशी-विदेशी मद्य विक्री, गावठी दारूचे उत्पादन, खुलेआम गुटखा विक्री, तसेच विनापरवाना लॉजही ‘फार्मा’त आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी जिल्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व प्रकरचे अवैध धंदे बंद करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. मात्र, उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व अवैध धंदे जोमात सुरु असून, पोलीस मात्र लुटुपुटुची कारवाई करत आहेत.
उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील आठ दिवसांत उरुळी कांचन पोलिसांनी हॉटेलच्या परिसरात दारू विक्री करणाऱ्या सहा जणांवर तुटपुंजी कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांच्याकडून काही मुद्देमाल जप्त केला आहे. उरुळी कांचन पोलीस ठाणे हे शहर पोलीस दलातून ग्रामीण पोलीस दलात समाविष्ट होऊन दोन महिने झाले. परंतु, अवैध व्यवसाय हे कमी होण्यापेक्षा त्यामध्ये वाढ होत असल्याची नागरिकांची दबक्या आवाजात चर्चा आहे. या बदलाने या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसायांवर कारवाई होऊन आळा बसेल, अशी अपेक्षा करणाऱ्या नागरिकांची घोर निराशा झाली आहे. वाढत्या अवैध धंद्यामुळे उरुळी कांचनसह परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पोलीस ठाण्याच्या हद्दीत परवाने नसताना यातील जवळपास प्रत्येक गावामध्ये अनेक हॉटेल व्यावसायिक मद्यविक्री करत आहेत. अवैध गावठी दारू, ताडी, गांजा यांची विक्री राजरोसपणे सुरू आहे. सामान्य नागरिकांना या अवैध धंद्यांचा त्रास होत आहे. मात्र, संबंधित व्यावसायिक आणि पोलीस यांचे संगनमत असल्याने याबाबत तक्रार कुठे करायची? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. तसेच अवैध व्यावसायिकांची दहशत असल्याने नागरिक तक्रार करण्यास पुढे येत नाहीत.
प्रतिबंध करणारी यंत्रणाच ठरतीये कुचकामी
गावोगावी काही तरुण व्यसनांसह अवैध मटक्याच्या आहारी गेल्याचे चित्र आहे. मटक्यातून अनेक वेळा वर्चस्ववादातून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. अशा घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. यास प्रतिबंध करणारी यंत्रणाच कुचकामी ठरत असल्याने अशा प्रकारचे गुन्हे वाढत आहेत.
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत अवैध धंदे जोरात
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत मटक्याचे व जुगाराचे अड्डे सुरु आहेत. नायगाव परिसरात मटक्याचा अड्डा असून, लहान-मोठे हातभट्टी विक्रीची दुकाने आहेत. तसेच शिंदवणे परिसरातही मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री, अवैध दारू, मटका, जुगार जोमात सुरु आहेत.
कारवाई करून व्यवसाय पूर्णपणे बंद करावेत
पोलिसांकडून कारवाई झाल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात हे व्यवसाय बंद होतात. त्यानंतर पुन्हा नव्या जोमाने हे व्यवसाय सुरू होत आहेत. त्यामुळे पोलिसांनी कडक कारवाई करून येथील व्यवसाय पूर्णपणे बंद करावेत, अशी येथील नागरिकांनी मागणी केली आहे.