Uruli Kanchan: उरुळी कांचन : दिवाळी हा सण म्हणजे दिव्यांचा, रोषणाईचा सण. सर्वच ठिकाणी अगदी प्रकाशमय वातावरण असते. पण उरूळी कांचनसह पिंपरी चिंचवड, निगडीमध्ये ऐन सणासुदीच्या काळात जवळपास दीड तास वीज पुरवठा खंडीत झाला होता. अदानी कंपनीच्या अतिउच्चदाब ४०० केव्ही शिक्रापूर ते तळेगावच्या एका वीजवाहिनीमध्ये शनिवारी (दि.११) पहाटे चारच्या सुमारास अचानक तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाल्याचे सांगितले जात आहे.
अदानी कंपनीच्या अतिउच्चदाब ४०० केव्ही वीजवाहिनीमध्ये बिघाड झाला होता. भारव्यवस्थापनासाठी एलटीएस (लोड ट्रिमिंग स्कीम) यंत्रणा कार्यान्वित झाली. सुमारे २०९ मेगावॅटची तूट भरून काढण्यासाठी महापारेषणचे १३२ केव्ही रहाटणी, २२० केव्ही चिंचवड, २२० केव्ही थेऊर, १३२ केव्ही यवत आणि २२० केव्ही उर्से अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला होता.
या भागांमध्ये सुमारे २०९ मेगावॅट विजेची तूट निर्माण झाली होती. त्यामुळे महापारेषण आणि महावितरणच्या उपकेंद्रांमधून भारव्यवस्थापन शक्य नसल्याने सकाळी सव्वा सात ते पावणेनऊ वाजेपर्यंत भारनियमन करावे लागले होते. याचा फटका पिंपरी, चिंचवड, पिंपळे सौदागर, काळेवस्ती, थेरगाव, वाकड, निगडी, प्राधिकरण, किवळे, खराडी, चंदननगर, मावळमधील काही भाग, उरुळी कांचन शहर यांसह इतर काही ठिकाणी बसला.