शिरूर: वरपर्यंत ओळख असल्याचे सांगून आणि सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवत 33 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी निशा लक्ष्मण शिंदे (रा.इंदापूर,ता.इंदापूर,जि.पुणे) या महिलेला शिरूर पोलिसांनी अटक केली आहे. विकास भिमराव नागरगोजे (रा.जोशीवाडी,ता.शिरूर,जि.पुणे) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात संबंधित महिलेच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.
निशा शिंदे ही महिला पोलिसांना अनेक दिवसांपासून गुंगारा देत होती. मात्र, शिरूर पोलिसांनी गोपनीय बातमीदाराच्या मदतीने महिलेला अटक करून कारवाई केली. पोलिसांनी अटक केल्यानंतर संबंधित महिलेस शिरूर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपी महिलेला 8 मे पर्यंत पोलीस कोठडी (रिमांड) सुनावली आहे.
या प्रकरणात संबंधित महिलेने “मी वरपर्यंत ओळख लावून सरकारी नोकरी देऊ शकते” असे सांगून फिर्यादी विकास नागरगोजे व त्यांच्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन सन 2023 ते 2025 या कालावधीमध्ये वेळोवेळी कधी फिर्यादी यांच्याकडून तर कधी फिर्यादी यांच्या पत्नीच्या बँक खात्यातून पैसे घेऊन सुमारे 33 लाख रुपये उकळले. मात्र,नोकरी मिळाली नसल्याने फसवणुक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांनी याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यावरून शिरूर पोलिसांनी कारवाई केली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलिसांचे चौकशी पथक करीत आहे.