लोणी काळभोर : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील निलेश विठ्ठल घुले व त्यांच्या पत्नी दमयंती यांना आदर्श समाजरत्न प्रेरणा गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्यामुळे या घुले दांपत्याचे लोणी काळभोरसह जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
पिंपरी चिंचवड येथील सायन पार्कच्या ऑडिटेरियम हॉलमध्ये आधार सोशल फाऊंडेशन, बेळगाव यांच्यावतीने नॅशनल फिनिक्स गोल्ड स्टार अवॉर्ड-2023 चे आयोजन रविवारी (ता.०५) करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यात घुले दाम्पत्याला आदर्श समाजरत्न प्रेरणा गौरव पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांची मानस कन्या सुनिता मोडक व सेवानिवृत्त पुणे जिल्हा न्यायाधीश रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्रसिद्ध वक्ते तथा लेखक प्रकाश कदम, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर साबुद्दीन पठाण, आधार सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विक्रम शिंगाडे, ढोकसांगवीचे उपसरपंच योगेश मलगुंडे, डॉ. दिलीप नेवसे, कल्याणी कुलकर्णी, डॉ.वाल्मीक वाघ, काळूराम मलगुंडे, संभाजी बन्ने, प्रिया वाघ, धोंडीबा कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, आधार सोशल फाऊंडेशन, बेळगाव यांच्यावतीने समाजाच्या सर्वांगीण विकासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्कार देऊन दरवर्षी गौरविले जाते. यावर्षी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या घुले दाम्पत्याला राष्ट्रीय आदर्श समाजरत्न प्रेरण गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. या पुरस्काराचे स्वरुप कोल्हापुरी फेटा, श्रीफळ, सन्मानचिन्ह, पत्र आणि मेडल असे आहे.
कामाची पोचपावती म्हणून पुरस्कार; घुले दाम्पत्याची भावना
यावेळी बोलताना निलेश घुले व त्यांच्या पत्नी दमयंती म्हणाल्या की, समाजाच्या सर्वांगीण हितासाठी तळागाळात काम करीत असताना, खूप आनंद वाटतो. मात्र, आपण केलेल्या कामाची पोचपावती म्हणून पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे खूप आनंद झाला आहे. या पुरस्कारामुळे अजून काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. तसेच आमच्या कामाची दखल घेऊन पुरस्कार दिल्याबद्दल आम्ही आधार सोशल फाऊंडेशनचे आभार मानतो. पुरस्कार मिळाल्याने येथून पुढे आमची अजून जबाबदारी वाढली आहे. ती जबाबदारी यशस्वी पार पाडण्याचा आम्ही दोघेही प्रयत्न करू, असं निलेश घुले म्हणाले.