पुणे : महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांनी, सहकुटुंब अष्टविनायक गणपती दर्शनाच्या निमित्ताने, श्रीक्षेत्र थेऊर येथील श्री. चिंतामणी गणपती मंदिरात सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या शुभहस्ते श्रींची आरती करण्यात आली. तसेच चिंचवड देवस्थानच्यावतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी त्यांनी, मागील काही दिवसांपूर्वी थेऊर येथे, भाविक भक्तांच्या जाणवणाऱ्या असुविधांबद्दल, पुणे शहरातील नामांकित वृत्तपत्राला बातमी प्रसिद्ध झाली होती आणि ती माझ्या वाचनात आली होती, याचा उल्लेख त्यांनी केला. यावेळी त्यांनी, थेऊर ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे यांच्याशी याबाबत, दूरध्वनी वरून संपर्क करून चर्चा केली.
थेऊर येथील वाहनतळ, शौचालय व भक्तनिवास या असुविधांबद्दल काही दिवसापूर्वी बातमी प्रसिद्ध झाली होती. याबाबत नीलमताई गोऱ्हे यांच्याशी दूरध्वनी वरून सविस्तर चर्चा झाली आहे. त्यांनी या सर्व कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी, सर्वोतपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन दिले आहे, असे युवराज काकडे यांनी सांगितले.
यावेळी चिंचवड देवस्थानचे विश्वस्त केशव विध्वंस, अष्टविनायक पतसंस्थेचे सचिव रूपचंद बोडके, अष्टविनायकचे संचालक रामचंद्र ऊर्फ बाबू बोडके, संचालक उत्तम बोडके, किरण काकडे, वैभव लवांडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.