उरुळी कांचन, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसर ते हिंगणगाव (इंदापूर) या दरम्यानच्या महामार्गावरील अनधिकृत अतिक्रमणे व विना परवाना बांधकाम पुढील 3 दिवसाच्या आत काढून घेण्याचे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) मार्फत करण्यात आले आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने याबाबतची नोटीस वर्तमानपत्रात दिली आहे. पुढील 3 दिवसात कोणत्याही क्षणी अतिक्रमणे काढण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी “पुणे प्राईम न्यूज” ला दिली आहे.
प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्याच्या दोन्ही बाजूस केलेली अनधिकृत अतिक्रमणे, बांधकामे स्वखर्चाने काढून घ्यावीत. अन्यथा ही अतिक्रमणे प्राधिकरणाच्या वतीने राष्ट्रीय राजमार्ग नियंत्रण (जमीन आणि वाहतूक) अधिनियम 2002 अन्वये निष्कासीत करण्यात येतील व त्याचा खर्च व दंड संबंधित धारकाकडून वसूल करण्यात येईल, असेही कदम यांनी सांगितले.
पुणे सोलापूर क्रमांक 65 वरील हडपसर ते हिंगणगाव (इंदापूर) पुणे नाशिक क्रमांक 60 वरील नाशिक फाटा ते चांडोली तसेच खेड (राजगुरुनगर) ते सिन्नर (नाशिक) क्रमांक 548 डी वरील तळेगाव-चाकण-शिकापूर, पुणे सातारा क्रमांक 48 वरील देहूरोड (पुणे) ते शेंद्रे (सातारा) व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग क्रमांक 965 वरील हडपसर ते दिवेघाट हद्दीत मिळकत धारकांनी अनधिकृतपणे अतिक्रमण केले असल्याचे निदर्शनास आले आहे. अतिक्रमण काढण्याबाबत प्राधिकरण तसेच जिल्हा प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही काही अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण काढलेले नाही.
एकदा कारवाई नको, तर सातत्य हवे
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जरी संबंधित अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात करणार असले, तरी त्याचा कितपत फायदा होईल. याबद्दल नागरिकांच्या मनात शंका आहे. कारण, मागच्या वर्षीच्या कारवाईचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यामुळे फक्त एकदा कारवाई करून भागणार नाही, असे नागरिकांना वाटत आहे.
अतिक्रमणधारकांना राजकीय पुढाऱ्यांचा आशीर्वाद
अतिक्रमणधारकांना स्थानिक राजकीय पुढारी, गावकारभारी व त्यांच्या बगलबच्च्यांचा पाठिंबा असल्याने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या कारवाईकडे पुण्यासह सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
अतिक्रमणाने ग्रासले रस्ते
पुणे-सोलापूर महामार्गाच्या दोन्ही बाजूला व्यापारी व व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केली आहेत. यामध्ये हडपसर, 15 नंबर शेवाळेवाडी, मांजरी, कवडीपाट टोल नाका, वाकवस्ती, लोणी स्टेशन चौक, लोणी कॉर्नर, कुंजीरवाडी, उरुळी कांचनमधील एलाईट चौक, तळवडी चौक व कासुर्डी टोलनाका या ठिकाणांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. यापैकी सुमारे 70 टक्के अतिक्रमणामुळे रस्त्यातील वाहतुकीला आडकाठी होत आहे.