भिगवण (पुणे) : तुम्ही बहुतांशी वेळा एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याची किंवा एखाद्या कंपनीतील कर्मचाऱ्याची सेवानिवृत्तीची बातमी ऐकली किंवा वाचली असेल पण कधी एखाद्या पेपर विक्रेत्याची सेवानिवृत्ती ची बातमी ऐकली नसेल ना. गेली 50 वर्षे ऊन, वारा, पाऊस याची कधीही तमा न बाळगता अखंड सेवा देणाऱ्या एका अवलीयाने शरीर साथ देत नाही म्हणून आता थांबण्याचा निर्णय घेतला म्हणजे काय तर थोडक्यात सेवानिवृत्ती.
भिगवणमध्ये गेली 50 वर्षे अविरतपणे पेपर वाचकांना त्यांच्या दुकानात, घरी अगदी रस्त्यावर भेटेल तिथे पेपर पोहचविण्याचे काम विनायक शेलार यांनी केले आहे. पांढऱ्या रंगाचा पायजमा आणि पांढऱ्या रंगाचा शर्ट, किरकोळ शरीरयष्टी, पांढरे केस, डोक्यावर पांढरी टोपी असा साधारणपणे पेहराव असणारे विनायक शेलार हे सकाळपासून भिगवणच्या मुख्य बाजारपेठेतून पेपर वाटताना दिसणार. पूर्वी वाहतुकीची यंत्रसामुग्री मोठ्या प्रमाणात नसल्यामुळे पेपर हे रेल्वेने भिगवण स्टेशन ला यायचे.
शेलार हे भल्या पहाटे भिगवण स्टेशनला सायकल वर जाऊन पेपरचे गट्टे सायकलवर घेऊन भिगवण व भिगवण परिसरात घरोघरी पेपर वाटायचे. गेली 50 वर्ष पेपर वाटण्याचे व्रत सायकलवरून केले आहे. सायकलच्या या व्यायामामुळे गेली 50 वर्षे ते निरोगी आयुष्य जगले आहेत. आजच्या आधुनिक जगातही वर्तमानपत्र वाचकांची वाचण्याची आवड जपण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कोणतीही मोठी अपेक्षा न ठेवता खर्ची घालत ही सेवा प्रामाणिकपणे गेली 50 वर्षे केली.
आता मात्र रोजच्या दैनंदिन कामामुळे शरीर आणि मन थकून गेले, आणि पहिल्यासारखा उत्साह ही राहिला नसल्यामुळे आता त्यांनी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या सेवानिवृत्ती निमित्त सामाजिक कार्यकर्ते व प्रसिद्ध ज्योती मिसळचे मालक चंद्रशेखर पवार यांच्या हस्ते त्यांचा छोटेखानी सत्कार करून पुढील काळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.