शिरूर, (पुणे) : रांजणगाव सांडस (ता. शिरूर) येथील रणपिसे वस्तीवरील एका राहत्या घरी 23 वर्षीय नवविवाहितेचा दोरीने गळा आवळून व हाताला विजेचा शॉक देऊन अज्ञात व्यक्तीने खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. बुधवारी (ता. 03) दुपारी ही घटना उघडकीस आली आहे.
शीतल स्वप्नील रणपिसे (वय २१, रा. रांजणगाव सांडस, ता. शिरूर) असे खून झालेल्या नवविवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पती स्वप्नील शामराव रणपिसे (वय 27 रा. रांजणगाव ता. शिरूर जि. पुणे) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोंढे (ता. पुरंदर) येथील दत्तात्रेय रघुनाथ वाघले यांची कन्या असलेल्या शीतल हिचा विवाह ३ डिसेंबर २०२३ रोजी रांजणगाव सांडस येथील श्यामराव पांडुरंग रणपिसे यांचा मुलगा स्वप्नील यांच्याशी झाला होता. शीतल हिचे पती स्वप्नील श्यामराव रणपिसे, सासू व माजी सरपंच शारदा श्यामराव रणपिसे हे शेतामध्ये गेले होते. तर, सासरे श्यामराव पांडुरंग रणपिसे हे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. शीतल ही घरामध्ये एकटीच होती.
दुपारी पती स्वप्नील घरी आले असता पत्नी शितल ही घरामध्ये मृत अवस्थेत आढळली. अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून तिचा निळ्या रंगाच्या दोरीने गळा आवळून व काळया रंगाच्या वायरने विजेचा करंट देत खून केला. बुधवारी दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान शीतल हिचा खून झाल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, शितलचा खून कोणी आणि का केला? याबाबत आता शिरूर पोलिस अधिक तपास करत असून झालेल्या प्रकारामुळे रांजणगावमध्ये एकच खळबळ माजली आहे. सदरील गुन्हा हा आता यवत पोलिसांकडून शिरूर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलिस करीत आहेत.