Newborn Baby | पुणे : देशात स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा उत्साहात साजरा होत असला तरी अनेक जुन्या रुढी, परंपरांसह तसेच सामाजिक दबाब अद्यापही सहन करावाच लागतो. अविवाहित मुलगी असेल किंवा अनैतिक संबंधातून एखादे मूल जन्माला आले असेल तर समाज का म्हणेल, या प्रश्नामुळे अनेक वेळा अशा बाळाचा जन्म झाल्यावर त्याला रस्त्यावर सोडून देण्यात येते. मात्र आता असे नकरता, अशी घटना घडण्यापूर्वी किंवा असा विचार आला तर थेट संपर्क साधा.
जन्माला आलेल्या बाळाला जगण्याचा अधिकार आहे, तो तुम्ही हिरावून घेवू नको. असे बाळ नको असेल तर त्या आईने जिल्ह्याच्या बालकल्याण समितीकडे संपर्क करावा. त्यांचे नाव गुप्त ठेवून, स्वत:ची तब्येत जपून प्रसूती होता येते. विशेष म्हणजे ते बाळ कायदेशीरपणे समितीकडे सोपवताही येते. ससूनसारख्या दवाखान्यात ही प्रसूती गुप्तपणे करता येते.
सिंहगड रस्ता परिसरातील एका १९ वर्षीय अविवाहित मुलीने गर्भवती असल्याचे लपून ठेवले. नऱ्हे येथील एका हाॅस्पिटलमध्ये बाळाला जन्म दिला आणि त्याला बाथरूमच्या खिडकीतून खाली फेकून दिले. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. अशी परिस्थिती उद्भवल्यास असे टाेकाचे पाऊल उचलण्याआधी थाेड विचार करा. स्वत:ला जपा अन् बाळालाही जगण्याचा हक्क मिळून द्या. यासाठी सुविधा असून त्याचा लाभ घ्या. शासनानेही याचे आवाहन करावे.
नको असलेली गर्भधारणा झाली अन् गर्भपात करता आला नाही तर अशा स्थितीत भीतीपोटी गुपचूप जन्म देऊन अर्भक रस्त्यावर किंवा निर्जन ठिकाणी फेकून देण्याचे प्रकार घडतात; मात्र असे न करता ससून रुग्णालयात तसेच खासगी रुग्णालयातही गुप्तपणे प्रसूती करता येते. बाळ नको असल्यास ते बालकल्याण समितीच्या वतीने शासकीय दत्तक देणाऱ्या संस्थेला देता येते.
असे करू नका…
कोंढवे धावडे येथे एका १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीने बाळाला घरीच जन्म दिला. समाजापासून ही गोष्ट लपवून राहावी म्हणून त्यांनी ते अर्भक सोसायटीच्या मागील भागात झाडांत टाकून दिल्याची घटना गतवर्षी घडली हाेती. एखाद्या हतबल महिलेवर किंवा कुटुंबावर अशी परिस्थिती ओढवल्यास त्यांनी ससून रुग्णालयाची किंवा खासगी रुग्णालयाची मदत घेणे गरजेचे असते. डॉक्टरांच्या देखरेखीखाली प्रसूती सुरक्षित होते. त्यांचे नावही गुप्त ठेवले जाते.
येथे करा संपर्क…
– चाईल्डलाईन संस्था
– पोलिस
– महिला हेल्पलाईन
– पोलिसांचा भरोसा सेल.
आईचे नाव गुप्त ठेवले जाते
बाळ नको असल्यास आईच्या संमतीने ते बालकल्याण समितीला सोपविता येते. ते बाळ दत्तक देणाऱ्या संस्थेला सुपूर्द केले जाते. अशा प्रकरणात ते बाळ कोठून आले, त्याची आई कोण आहे? ही माहिती दत्तक केंद्रातील कर्मचाऱ्यांनाही नसते. त्यामुळे आईचे नाव गुप्त ठेवले जाते. याबाबात महाविद्यालयांमध्ये जनजागृती करायला हवी. – बीना हिरेकर, माजी सदस्य, जिल्हा बालकल्याण समिती.