लोणी काळभोर, ता. 6 : मुलाचा जन्म झाल्यानंतर प्रत्येकाच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण असते. मग मुलगा असो वा मुलगी असो त्यांच्या जन्माचे स्वागतही वेगवेगळ्या परंपरेनुसार होत असते. त्यातच लोणी काळभोर (ता. हवेली) येथील युवा उद्योजक इंद्रजीत अभय काळभोर यांनी आपल्या मुलाच्या जन्माचे स्वागत मराठमोळी संस्कृती जपत सनई चौघाड्यांच्या मंगलमयी सुरात, तुतारी वाजवून व मराठमोळ्या नऊवारी साडीतील महिला, फुलांचा वर्षाव, रांगोळ्यांच्या पायघड्या, औक्षण आणि घरावर गुढी उभारून मोठ्या दिमाखात केले. त्यामुळे त्यांच्या या पुत्रप्रेमाची लोणी काळभोर सह परिसरात भरभरून चर्चा होत असून नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
इंद्रजीत काळभोर आणि जान्हवी काळभोर यांना नुकतेच पुत्ररत्न प्राप्त झाले. घरातील नव्या सदस्याचे स्वागत करताना अलीकडे डीजे, फटाके यांचा अतिरेक केला जातो. मात्र या सर्व गोष्टींना फाटा देत जान्हवी आणि इंद्रजीत यांनी आपल्या बाळाचे पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यासाठी तयारी केली होती. या स्वागत समारंभात 500 हून अधिक लोक सहभागी झाले होते, ज्यात पाचशे वाहने समाविष्ट होती. हा ताफा जान्हवी यांच्या माहेरून निघून लोणी काळभोरला जाताना दिसला, ज्यामुळे संपूर्ण मार्गावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
घरी नव्या पाहुण्याचे आगमन होताच कुटुंबीयांचा आनंद गगनात मावत नव्हता. मुलगा झाल्याच्या आनंद नातेवाईकांनी मिठाई वाटून साजरी केला. नव्या पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी घराला सजावट करण्यात आली. स्वागत समारंभात सनई-चौघड्यांच्या मंगलमय सुरांनी वातावरणाला अधिकच मोहक बनवले. घरात प्रवेश करताना बाळावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. त्यानंतर औक्षण करून आणि रांगोळ्यांच्या पायघड्या घालून त्याचे स्वागत करण्यात आले. यानिमित्ताने घरावर गुढी उभारण्यात आली होती. अशा प्रकारे मराठी संस्कृतीनुसार नवजात बाळाचे स्वागत खूपच अनोखे बनले.
दरम्यान, नवजात बाळाच्या आगमनाची बातमी मिळताच, इंद्रजीत काळभोर यांनी आणि त्यांच्या परिवाराने स्वागत समारंभाची तयारी आधीपासूनच सुरू केली होती. घराची सजावट, रांगोळ्या काढणे, औक्षणाची तयारी यासारख्या सर्व गोष्टींचा समावेश होता. मुलाच्या जन्मामुळे घरातील सदस्यही खूप आनंदात आहेत. इंद्रजीत काळभोर यांनी नवजात बाळाचे स्वागत करताना मराठी परंपरा आणि संस्कृतीचे पालन केले.
“बाळ येणार याची चाहूल लागल्यानंतर प्रत्येक घरात जसे आनंदाचे, उत्साहाचे वातावरण असते. तसेच आमच्या घरामध्ये होते. आपल्या बाळाचे घरी आगमन होताना कसे स्वागत करायचे, याचा विचार करत असताना मुलगी झाली तर…आणि मुलगा झाला तर… कसे स्वागत करायचे? या दोन्हींचा आनंदोत्सव वेगवेगळ्या पद्धतीने करायचा. असे नियोजन केले होते. पुत्ररत्न प्राप्त झाल्यानंतर प्रभू रामचंद्र किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांचे जसे स्वागत झाले असेल त्याच राजेशाही पद्धतीने थाटात, पारंपारिक मराठमोळ्या पद्धतीने स्वागत केले.”
-इंद्रजीत काळभोर