युनूस तांबोळी
शिरूर (पुणे) : राज्यात २०२० मध्ये कोरोना विषाणूचा शिरकाव झाला. लॉकडाऊनमुळे अनेक कुटुंबांतील कर्त्या व्यक्तींच्या रोजगारावर गदा आली. रोजीरोटीचा प्रश्न आ वासून उभा राहिला. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील नवनाथ रणपिसे या तरूणाला देखील या महामारीचा फटका बसला. शिलाईचे काम बंद पडले. त्यातून ते बेरोजगार झाले. मात्र, कुटुंबासाठी काही करायचे असा विचार करून पत्नी मनिषाने त्यांना आधार दिला. भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू करून पतीच्या खांद्याला खांदा लावून कुटुंबाला रोजीरोटीचा मार्ग मिळवून देण्यात ते यशस्वी झाले.
लॉकडाऊनमध्ये गावागावातील बाजार, मंडई, दुकाने बंद करण्याची सक्ती करण्यात आली होती. मजुरांच्या हाताला काम मिळत नव्हते. उपजिवीकेची चिंता सर्वांनाच भेडसावत होती. पिंपरखेड (ता. शिरूर) येथे शिवणकाम करून प्रपंच सांभाळणाऱ्या नवनाथ रणपिसे यांचा शिलाईचा व्यवसाय या काळात बंद पडला. दोन मुले, पत्नी, आई-वडील असे एकत्र कुटुंब कसे चालवायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. पहिल्या लॉकडाऊनमध्ये त्यांनी कसेबसे कुटूंब सावरले. मात्र, व्यवसाय बंद पडल्याने ‘चूल बंद’ झाली.
या कठीण काळात त्यांची पत्नी मनिषा हिने पती व कुटुंबाला सावरण्याचे काम केले. नागरिकांना ताजा भाजीपाला घरपोच दिल्यास त्यांचीही गरज भागेल व आपल्यालाही काम उपलब्ध होईल, या उद्देशाने या दांपत्याने शेतकऱ्यांच्या रानातून भाजीपाला आणून कोविडचे सर्व नियम पाळत घरोघरी देण्याचा व्यवसाय सुरू केला. नागरिकांना देखील घरपोच ताजी भाजी मिळू लागल्याने त्यांचीही सोय झाली. ताज्या भाजीला मागणी वाढली. त्यातून पैसेही मिळू लागले. घरचा रोजीरोटीचा प्रश्न मार्गी लागला.
या व्यवसायाला घरच्यांची देखील साथ मिळू लागली. त्यामुळे सर्वच प्रकारच्या भाज्या आणायच्या व त्या घरोघरी विकायच्या हा व्यवसाय सुरू झाला. त्यातून जांबूत (ता. शिरूर) येथील पंचतळे चौकात त्यांनी भाजीचा व्यवसायाला सुरूवात केली. लॅाकडाऊन संपल्यानंतर जनजीवन पूर्ववत सुरू झाल्यावर टेलरींग काम करण्यापेक्षा या व्यवसायावरच त्याने भर दिला. पुणे मार्केटमधून भाजीपाला, फळे खरेदी करून या चौकात त्यांनी दुकान थाटले आहे. परिसरातील शेतकरी देखील त्यांना ताज्या भाज्या पुरवत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील भाजीपाल्याला जवळचा खरेदीदार मिळाला आहे. त्यातून त्यांचा व्यवसाय भरभराटीला आला असून, कुटूंबाची साथ मिळत असल्याने या व्यवसायातून जगण्याचा मार्ग मिळाला आहे.
लॉकडाऊनने दाखविला जगण्याचा मार्ग..
कोवीडसारख्या महामारीत जगणे कठीण झाले होते. हाताला काम मिळेनासे झाले होते. आता करायचे काय, जगायचे कसे असा प्रश्न होता. त्यामधूनच हा भाजी विक्रीचा मार्ग सापडला आणि माझा व्यवसायाचा मार्ग मोकळा झाला. आता मी कुटूंबाचा उदरनिर्वाह करू शकतो. मुलांना देखील शिक्षण देऊन त्यांच्या पायावर उभे करू शकतो. लॅाकडाऊनने मला या व्यवसायाच्या माध्यमातून माझा जगण्याचा मार्ग दिला आहे.
– नवनाथ रणपिसे, भाजी विक्रेता
समाधान देणारा व्यवसाय
लॉकडाऊन असल्याने कुटूंब कसे चालवायचे हा प्रश्न उभा राहिला होता. मुलांचे शिक्षण, आरोग्य त्यापाठोपाठ प्रपंच कसा उभा करायचा, हा प्रश्न होता. भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केल्याने नागरिकांना देखील सोयीस्कर झाले. त्यातून व्यवसायाला चालना मिळाली. आजही हा व्यवसाय करत असताना लॅाकडाऊनची आठवण येते. पण त्यातून मिळालेला जीवनाचा मार्ग समाधान देऊन गेला.
– मनिषा रणपिसे, भाजी विक्रेती