पुणे : पुण्यातील बिबवेवाडी परिसरातून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. दरवाजातून जाताना पुतणीने जाणीवपूर्वक धक्का दिला. त्याचा जाब विचारल्यानंतर दोन पुतण्या, वहिनी आणि भावाने ६३ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाला लाकडी दांडक्याने जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, या ज्येष्ठ नागरिकाने पोलिस ठाण्यात धाव घेतल्यावर या पुतणीने विनयभंगाची तक्रार दिली आहे.
ही घटना बिबवेवाडीतील एका सोसायटीमध्ये रविवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबत एका ६३ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ३५ व ४२ वर्षाच्या त्यांच्या पुतण्या, ६५ वर्षाची वहिनी आणि ७५ वर्षाच्या मोठ्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या भावाच्या मुलीने दरवाजात फिर्यादीस जाणीवपूर्वक जोरात धक्का दिला. त्याचा तिला जाब विचारल्यावर असता दोन्ही मुलींनी त्यांना हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या वहिनीने लाकडी दांडके या मुलीच्या हातात दिले. त्यांनी लाकडी दांडक्याने फिर्यादी यांच्या पायावर मारहाण केली. तसेच मोठ्या भावाने शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
दरम्यान, काका विरोधात पुतणीने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ६३ वर्षाच्या काकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले कि, फिर्यादीचे काका यांनी फिर्यादीचे राहते घरासमोर फिर्यादीस हाताने मारहाण केली. फिर्यादीने परिधान केलेला टी शर्ट जोरात ओढला.
त्यामुळे फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न झाली. फिर्यादी हे ओरडले असता त्यांची बहिण तेथे आली. काकाने तिलाही मारहाण केली. यापूर्वीही काका अश्लिल हावभाव करुन फिर्यादीस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले, असे फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेचा तपास पोलीस हवालदार पारखे करीत आहेत.