नारायणगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीतील घटक पक्षांतील उमेदवाराच्या विरोधात पक्षविरोधी भूमिका घेतल्याने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम सखाराम लांडे व युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अमोल देवराम लांडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.
जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आदिवासी नेते देवराम लांडे व त्यांचे पुत्र अमोल लांडे यांनी महायुतीचे जुन्नर विधानसभेचे अधिकृत उमेदवार अतुल बेनके यांच्या सोबत न राहता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात वंचित आघाडीकडून विधानसभेची उमेदवारी घेऊन बेनके यांच्या विरोधात निवडणुकीला सामोरे जात असल्याने महायुती सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे कृत्य पक्षशिस्त भंग केलेला असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी लेखी पत्राद्वारे देवराम लांडे व त्यांचे पुत्र अमोल लांडे यांना महायुती सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न व पक्षशिस्त भंग केल्याच्या कृत्याला जबाबदार धरून पक्षातून निलंबित केले आहे.