पुणे : केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये शहरी विभागात पुणे महापालिकेला तिसरा क्रमांक मिळाला आहे. या पुरस्कारामुळे पुणे महापालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. दिल्ली येथील विशेष कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
पुणे शहराच्या सर्व भागांमध्ये समान दाबाने आणि 24 तास पाणीपुरवठा व्हावा, यासाठी पुणे महापालिकेच्या वतीने समान पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. 2047 पर्यंतचा विचार करून, पुणे शहराची लोकसंख्या 50 लाख गृहीत धरून ही योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीनंतर शहरातील पाणी वितरणातील 40 टक्के गळती कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
सध्या पुणे महापालिकेच्या वतीने शहरातील 76 टक्के घरांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. दररोज चार तास हा पाणीपुरवठा होत असतो. प्रति व्यक्ती 157 लिटर पाणीपुरवठा केला जातो. पाण्याची सुरु असलेली गळती थांबवण्यासाठी आणि शहरातील सर्व भागांतील नागरिकांना समान पद्धतीने पाणी पुरवठा व्हावा, यासाठी आतापर्यंत शहरातील 43 टक्के नळजोडांवर मीटर बसविण्यात आले आहेत. महापालिका प्रशासनाकडून शहरातील नागरिकांना 100 टक्के दर्जेदार पाणी पुरविले जाते. तसेच नागरिकांकडून महापालिका प्रशासनाकडे पाणीपुरवठ्याबाबत आलेल्या 85 टक्के तक्रारींचे निवारण केले जाते. पाणीपट्टीच्या वसुलीचे प्रमाण 60 टक्क्यांपासून महसूल न मिळणा-या पाण्याचे (एनआरडब्ल्यू) प्रमाण 30 टक्के आहे., असा दावा पालिकेने पुरस्कारासाठी पाठवलेल्या प्रस्तावात केला आहे.
पुणे शहरात 100 टक्के रहिवासी भागात शौचालये आहेत. या शौचालयांची एकूण संख्या सहा लाख 19 हजार 822 इतकी आहे. यात 822 कम्युनिटी, तर 292 पब्लिक टॉयलेट्सचा समावेश आहे. पुणे शहरातील 98 टक्के भागांत सांडपाणी वाहिन्यांचे जाळे आहे. शहरात दररोज तयार होणाऱ्या 477 दशलक्ष लिटर प्रतिदिन सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. हे प्रमाण सुमारे 75 टक्के इतके आहे. यापैकी 60 टक्के पाण्याचा पुनर्वापर महापालिकेच्या वतीने केला जातो. कृषी, सिंचन, बांधकाम, उद्याने अशा विविध माध्यमांतून हा वापर केला जात असल्याचे पुणे महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.