उरुळी कांचन, (पुणे) : विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांचे चरित्र वाचा व त्यातून खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय याची जाणीव होईल असे प्रतिपादन जेजुरी येथील शरदचंद्रजी पवार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनाजी नागणे यांनी केले.
उरुळी कांचन (ता. हवेली) येथील पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (ता. २४) आजीवन अध्ययन विस्तार कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय एकात्मता कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी प्राचार्य नागणे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब भगत हे होते.
या कार्यशाळेत प्रा. बंडू उगाडे यांनी राष्ट्रीय एकात्मतेवर दुसरे पुष्प गुंफून सखोल मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत एकूण ९३ विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता.
दरम्यान, सदर कार्यक्रमाचे आयोजन व प्रस्ताविक आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे समन्वयक प्रा. डॉ. निलेश शितोळे यांनी केले. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. नंदकिशोर मेटे, उपप्राचार्य डॉ. अविनाश बोरकर, प्राध्यापक अंजली शिंदे, विजय कानकाटे, भाऊसाहेब तोरवे, प्रदीप राजपूत, मोरेश्वर बगाडे, विशालदीप महाडिक यांनी विशेष सहकार्य केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शुभांगी रानवडे, तर आभार प्रतीक्षा मूल्या यांनी मानले.