नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील धनगरवाडी येथे अवैधरीत्या चालणाऱ्या गावठी हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त करीत १२० लीटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केल्याची माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.
याप्रकरणी प्रिया उमेश मारवाडी (वय २८, रा. धनगरवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे) या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कॉन्स्टेबल गोरक्ष हासे यांनी फिर्याद दिली आहे. मंगळवारी (दि. १) नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत धनगरवाडी येथे अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू-ताडी विकली जात असल्याची गोपनीय माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार यांना मिळाली.
त्यानंतर पोलीस हवालदार संतोष कोकणे, महिला पोलीस हवालदार तनुश्री घोडे, पोलीस शिपाई दत्ता ढेंबरे, गोरक्ष हासे, गंगाधर कोतकर, निचीत, महिला पोलीस शिपाई बुचके या पथकाने छापा टाकून प्रिया मारवाडी यांच्या घराच्या पाठीमागे तयार केलेला गावठी हातभट्टीचा अड्डा उध्वस्त करत १२ हजार किमतीची १२० लीटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली आहे.