पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यात दोन दिवसांत २९ व ३० एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहा सभा होणार आहेत. मोदी यांच्या सोमवारी आणि मंगळवारी प्रत्येकी तीन सभा होणार आहेत. महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सोमवारी सोलापूर, कराड आणि पुणे येथे, तर मंगळवारी माळशिरस, धाराशिव आणि लातूर येथे प्रचारसभा होणार आहेत.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसिद्धी पत्रकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यातील दोन दिवसांतील सभांच्या कार्यक्रमाची माहिती दिली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप-महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी दुपारी दीड वाजता होम मैदान येथे, कराड येथे उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ होणारी सभा दुपारी ३.४५ वाजता, पुणे येथील सभा सिंध्याकाळी ५.४५ वाजता हडपसर येथे रेसकोर्स मैदानावर होणार आहे. ही सभा पुण्याचे महायुती उमेदवार मुरलीधर मोहोळ, मावळचे श्रीरंग बारणे, बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि शिरुरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ होणार आहे.
३० एप्रिल, मंगळवारी दुपारी ११.४५ ला माढामधील महायुतीचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी माळशिरस येथे, दुपारी दीड वाजता धाराशिव येथे महायुतीच्या उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना पाटील यांच्यासाठी, तर दुपारी ३ वाजता लातूर येथे भाजपचे सुधाकर शृंगारे यांच्यासाठी सभा होणार आहे, असे बावनकुळे यांनी पत्रकात म्हटले आहे. भारतीय जनता पार्टी तसेच महायुतीतील सर्व घटक पक्षांकडून पंतप्रधान मोदी यांच्या सभांची जय्यत तयारी चालू आहे, अशी माहितीही बावनकुळे यांनी दिली.