पिंपरी : नालासोपारा येथून नायजेरियन नागरिकांकडून अमली पदार्थ आणून हिंजवडीमध्ये त्याची विक्री करताना पोलिसांनी दोघांना पकडले. त्यांच्याकडून ७ लाख ५२ हजार ७०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, याबाबत पोलीस नाईक अजित लिंबराज कुटे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, इम्रान चाँद शेख (वय ३२, रा. मिठानगर, कोंढवा) आणि समीर शहाजहान शेख (वय ४०, रा. माहिम, मुंबई) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून ६५ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.), मोटारसायकल, रोख रक्कम, तीन मोबाईल असा ७ लाख ५२ हजार ७०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेतील अंमली पदार्थ विरोधी पथक हिंजवडी परिसरात रात्री गस्त घालत असताना त्यांना मुंबई -बेंगळुरु महामार्गावरील भुजबळ चौकात दोघे जण अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. सोनम हॉटेलसमोर दोघे जण संशयितरित्या थांबलेले आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असताना त्यांच्याकडे ६५ ग्रॅम एम.डी. आढळून आला. त्याबाबत चौकशी केल्यावर इम्रान शेख याने समीर शेख याच्या ओळखीतून नालासोपारा येथील एका टोनी नावाच्या नायजेरियन नागरिकाकडून हे अंमली पदार्थ घेतल्याचे सांगितले.
या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक खटाळ करीत आहेत.