पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शनिवारी (दि.२४) पुण्यामध्ये झालेल्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतिक बैठकीत प्रांत संघचालकपदी नगर येथील नानासाहेब अण्णाजी तथा सुरेश जाधव यांची निवड करण्यात आली.
संघाच्या रचनेत दर तीन वर्षांनी शाखा प्रतिनिधींकडून अशी निवड केली जाते. नानासाहेब जाधव यांनी कृषी अभियांत्रिकीच्या मृद व जलसंधारण या विषयातील पदव्युत्तर (एम.टेक.) शिक्षण पूर्ण केले. शिक्षणानंतर ते पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर या तालुक्यांना व त्यानंतर जळगाव जिल्हा प्रचारक म्हणून सहा वर्षे संघाचे पूर्णवेळ (प्रचारक) काम केले आहे. त्यानंतर ते राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालाय धुळे येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाले.
त्यानंतर ते महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या राहुरी येथील प्रक्षेत्र संचालनालय, डॉ. आण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, वनशेती संशोधन प्रकल्प राहुरी येथे प्राध्यापक, शास्त्रज्ञ या पदांवर कार्यरत होते. २०१२ साली कृषी विद्यापीठातून शास्त्रज्ञ म्हणून निवृत्त झाले.
शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना संघात शाखा मुख्याशिक्षक, जिल्हा शारिरीक प्रमुख या पदांवर कार्य केले. प्रचारक म्हणून निवृत्त झाल्यावर जिल्हा सहकार्यवाह, विभाग सहकार्यवाह, विभाग कार्यवाह, २००१ पासून पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहकार्यवाह, प्रांत कार्यवाह अशा जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत.
२०११ ला प्रांत सहसंघचालक पदांवर व २०१३ ला प्रांत संघचालक या पदावर नियुक्ती झाली. २०१५ त्यांची पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक या पदावर निवड झाली. तेव्हापासून ते ही जबाबदारी सांभाळत आहेत. आतापर्यंत त्यांची २०१५, २०१८, २०२१ आणि आता पुन्हा २०२४ अशी चार वेळा प्रांत संघचालक पदावर निवड झाली आहे.