उरुळी कांचन : नायगाव (ता. हवेली ) येथील नायगाव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना 13 टक्के लाभांश देण्यात आला आहे. पतसंस्थेची 24 वी वार्षिक सर्वसाधारण सभा श्री काळभैरवनाथ मंदिर नायगाव येथे नुकतीच पार पडली. यावेळी सभासदांना 13 टक्के लाभांश देण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी दिली.
संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला सभासदांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती लावली होती. यावेळी वरील माहिती चौधरी यांनी दिली.
यावेळी उपाध्यक्ष किरण गुळुंजकर, माजी सरपंच गणेश चौधरी, कायदा सल्लागार नवनाथ गाढवे, कृष्णा चौधरी, नवनाथ गायकवाड, योगेश चौधरी, नितीन हगवणे, माजी उपसरपंच उत्तम शेलार, संतोष हगवणे, रामचंद्र पवार, सुरेश हगवणे, विजय चौधरी, कैलास चौधरी, व्यवस्थापक नंदकुमार चौधरी व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
यापुढे बोलताना राजेंद्र चौधरी म्हणाले कि, 2023- 24 या वर्षाच्या अखेर संस्थेच्या ठेवी रू 12.26 कोटी, कर्ज पुरवठा रू 10.14 कोटी, गुंतवणूक रू. 4.30 कोटी व खेळते भांडवल रू. 17.38 कोटी असून संस्थेत ऑडीत वर्ग अ मिळालेला असून पतसंस्थेकडून सभासदांना 13 टक्के लाभांश जाहीर करण्यात आला आहे. 17 कोटीपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या या संस्थेमार्फत विविध व्यवसायाला कर्ज पुरवठा केला जातो.
पाईप कारखाना टाकण्यासाठी शेतकरी कुटुंबातील तरुणांना नवीन व्यवसायासाठी कर्ज पुरवठा करण्यात संस्था अग्रेसर आहे. पतसंस्थेने या आर्थिक वर्षात संस्थेच्या कार्यालयासाठी जागा खरेदी केली असून लवकरच त्यावर इमारत बांधकाम सुरू करणार असल्याचे तसेच सभासदांचे मागणीनुसार सोने तारण, कॅश क्रेडिट सुविधा, गृह कर्ज नजीकच्या काळात सुरू करणार असल्याची माहिती चेअरमन राजेंद्र चौधरी यांनी दिली.
या सभेत 2023 -24 या आर्थिक वर्षाचे आर्थिक पत्रके, अंदाज पत्रक, लेखापरीक्षण अहवाल, अंदाजपत्रक पेक्षा कमी-जास्त खर्च इत्यादी विषयांना सभेत मंजुरी देण्यात आली. वार्षिक सभेचा इतिवृत्तांत व्यवस्थापक नंदकुमार चौधरी यांनी वाचून दाखवला. सुरुवातीला विविध क्षेत्रातील दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली, तसेच विविध क्षेत्रात निवड झालेल्या व पुरस्कार मिळालेल्या मान्यवरांचे अभिनंदन करण्यात आले.
संस्थेविषयी माहिती देऊन सभेतील विषयांचे सविस्तर विश्लेषण केले. पतसंस्था नियमक मंडळाच्या निर्देशानुसार ठेवी व कर्जाचे व्याजदर करण्यात आले असुन सभासदांना तत्पर सेवा मिळावी व दैनंदिन कामकाज अद्यावत होण्यासाठी संस्थेने आरटीजीएस ,एनईएफटी या सुविधा सुरू केल्या असून सभासद व खातेदारांना रोजच्या व्यवहाराचे मेसेज मोबाईलवर मिळत असून नियमक मंडळाच्या अटी व शर्तीस अधीन राहून संस्थेने ठेवी व कर्ज यावरील व्याज आकारणी केली असल्याची माहिती चौधरी यांनी दिली.
दरम्यान, संस्था चालवताना पैशावर विश्वास न ठेवता विश्वासावर पैसा ठेवावा व त्या विश्वासाला तडा न जाता संस्था चांगल्या पद्धतीने चालावी, असे ज्ञानेश्वर शेलार यांनी सांगितले. यावेळी वार्षिक सभेचा इतिवृत्तांत व्यवस्थापक नंदकुमार चौधरी यांनी वाचून दाखवला.