उरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचनपासून जवळच असलेल्या शिंदवणे (ता. हवेली) येथील संत यादवबाबा माध्यमिक विद्यालयातील एका शिक्षकावर अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. उरुळी कांचन-शिंदवणे रस्त्यावर बुधवारी (ता. ६) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत शिक्षक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर हडपसर येथील एका नामांकित रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मोहन गोरखनाथ आंबेकर (वय ५६, रा. आंबेकरवस्ती, थेऊर फाटा, कुंजीरवाडी, ता. हवेली) असे मारहाण झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे बंधू संभाजी गोरखनाथ आंबेकर (वय ५९) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन आंबेकर हे शिंदवणे येथील संत यादवबाबा माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहेत. बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास संभाजी आंबेकर यांना एका नातेवाईकाने फोन करून सांगितले की, तुमचे बंधू मोहन आंबेकर यांचा अपघात झाला असून, त्यांना उरुळी कांचन येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
संबंधित घटनेची चौकशी करून आंबेकर हे तत्काळ रुग्णालयात पोहोचले. यावेळी मोहन आंबेकर हे बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. डॉक्टरांकडे चौकशी केली असता डॉक्टरांनी सांगितले की, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, अंतर्गत रक्तस्त्राव झाला आहे. त्यानुसार त्यांना पुढील उपचारासाठी हडपसर येथील एका नामांकित रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, आंबेकर यांनी अपघात झालेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, त्याठिकाणी त्यांची दुचाकी सुस्थितीत दिसून आली. पुढे जाऊन पाहिले असता एक लाकडी दंडुका पडलेला होता. त्याच्या शेजारीच रक्ताचे डाग दिसले. यावरून अपघात झालेला नसून, त्यांना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मारहाण केल्याची खात्री झाली. त्यावरून अज्ञात व्यक्तीविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोणी काळभोर पोलीस अधिक तपास करीत आहेत.