येरवडा (पुणे) : पुण्यात रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. अशातच आता येरवडा परिसरात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेम प्रकरणातून एका व्यक्तीचा कोयत्याने वार करत अतिशय निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली आहे. मुलाने आंतरधर्मीय विवाह केल्याच्या रागातून त्याच्या वडिलांचा खून केला आहे.
ही घटना येरवडा येथील राजीव गांधीनगर घडली आहे. कटाळू कचरू लहाडे ( वय-55 ) असं कोयत्याने वार करून खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. इस्माईल शेख नामक तरुणाने त्याच्यावर कोयत्याने वार केले. दुचाकीवर आलेल्या दोघाजणांपैकी एकाने कटाळू लहाडे यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये त्यांच्या डोक्यावर व हातावर गंभीर मारहाण केल्यामुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे.
याघटनेबाबत पोलीसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राजीव गांधी नगर भागात ही खुनाची घटना घडली. आज (सोमवारी) कटाळू कचरू लहाडे (वय 60 वर्षे) याला आरोपी इस्माईल रियाज शेखने धारदार शस्त्राने तोंडावर वार करून मारले. आरोपीच्या बहिणीस मयताच्या मुलाने पळवल्याने हा खून केला असल्याचे सांगितले जात आहे.
आरोपी इस्माईल रियाज शेख (वय 25) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मयताचा मृतदेह पोस्टमार्टम करता पाठवून देण्यात आलेला आहे. घटनास्थळी योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आला असून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे, अशी माहिती येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके यांनी दिली.