पुणे : खराडी आणि वडगाव धायरी येथील पंतप्रधान आवास योजनेला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता आणखी चार ठिकाणी ही योजना राबविली जाणार आहे, अशी माहिती महापालिकेचे मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिली आहे. हडपसर, कोंढवा, बाणेर, बालेवाडी या ठिकाणी ही घरे उभी केली जाणार आहे, त्यासाठी प्रकल्प सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रीया सुरु केली जाणार आहे. महापालिकेने पंतप्रधान आवास योजनेतंर्गत खराडी, वडगांव येथे सुमारे २ हजार ८०० सदनिका उपलब्ध करून दिल्या आहे.
सदर प्रकल्प महापालिकेने स्वतः उभे केले आहे. महापालिकेच्या ताब्यातील जागांवर हा प्रकल्प उभा केला जात असल्याने बांधकामाचा खर्च मर्यादीत राहतो. यामुळे सदनिकांची किंमतही आर्थिक दुर्बल घटकांना परवडू शकते. यामुळे यापुर्वी उभारलेल्या सर्व सदनिकांची विक्री झाली आहे.
यासंदर्भात महापालिकेचे मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे म्हणाले, पुढील टप्प्यात हडपसर, कोंढवा, बाणेर आणि बालेवाडी येथे पंतप्रधान आवास योजनेची घरे उभारण्यात येणार आहे. साधारणपणे अडीच हजार घरे या प्रकल्पातून उभी केली जातील. या प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्त करण्यासाठी लवकरच निविदा प्रक्रीया राबविली जाणार आहे.