पुणे: विकेंड आणि नाताळ सणामुळे शाळा, महाविद्यालयांना सलग सुट्ट्या आल्याने पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावर वाहनांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अवजड आणि जड वाहनांनी या शनिवार, रविवार आणि सोमवारी दुपारी बारानंतर घाटातून प्रवास करावा, असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे.
आज शनिवार, रविवार आणि सोमवार अशा सलग तीन सुट्ट्या आल्याने आणि नाताळ सण असल्याने अनेक जण लोणावळ्यात पर्यटनासाठी येण्याची शक्यता आहे. दरवर्षी मोठी गर्दी लोणावळ्यात होत असते. तीनही दिवशी वाहनांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. सलग सुट्टी आल्यामुळे घाटांमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अवजड वाहनांना घाट सुरू होण्यापूर्वी थांबविण्यात येते.
मागील वर्षी अवजड आणि कार (हलकी वाहने) हे एकत्र आल्याने पहाटे सहा ते दुपारी बाराच्या दरम्यान फार मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे यावर्षी अवजड आणि जड वाहनांनी घाटामधून दुपारी बाराच्या नंतर प्रवास करावा, असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे. यामुळे सकाळच्या सत्रात घाटामध्ये वाहतूक कोंडी होणार नाही आणि चालकांचा वेळ वाचेल.