Mulshi News मुळशी : नंबर प्लेट नसलेल्या पांढऱ्या रंगाच्या होन्डा अमेज कारमधून ते दोघे खाली उतरले… कारमध्ये तीनशे रुपयांचे पेट्रोल टाकण्यास सांगितले… दरम्यान, आपण लंडनमधून आल्याचे सांगत परदेशी चलन दाखवून पट्रोलपंपावरील व्यक्तींचा विश्वास संपादन केला… (Mulshi News) भारतीय चलन दाखवा, अशी मागणी करत पेट्रोलपंपावर जमा झालेली रक्कम त्यांनी पाहण्यासाठी घेतली… रक्कम परत करताना पॅंटच्या खिशात ठेवल्याचे भासवले अन् हातोहात फसवणूक करून, त्या दोघांनी तेथून पोबारा केला… फसवणूक झाल्याचे कळले तेव्हा वेळ निघून गेली होती. मुळशी तालुक्यातील अकोले येथील ढमाले एचपीसीएल पेट्रोलपंप येथे हा धक्कादायक प्रकार घडला. (Mulshi News)
पौड पोलीस ठाण्यात दाखल
याप्रकरणी अशोक दादू चव्हाण (वय ५२, रा. अकोले, मुळशी) यांनी फसवणूक झाल्याची तक्रार पौड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. ढमाले हे एचपीसीएल पेट्रोलपंप येथे गेले आठ वर्षांपासून पेट्रोल व हवा भरून देण्याचे काम करतात. शनिवारी (ता. २४) संध्याकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास चव्हाण आणि रमेश तुकाराम शिंदे (सध्या रा. अकोले गाव) हे दोघे पंपावर पेट्रोल व डिझेल भरून देण्यासाठी कामावर होते.
दरम्यानच्या काळात नंबर प्लेट नसलेली पांढऱ्या रंगाची होन्डा अमेज कार आली. त्यातील दोन व्यक्ती गाडीतून खाली उतरल्या. एकाने अशोक चव्हाण यांना ३०० रुपयांचे पेट्रोल टाका,अशी हिंदीतून सूचना केली. आम्ही लंडन येथील रहिवाशी आहोत असे सांगून, परदेशी चलन दाखवले. आम्हाला तुमच्याकडील भारतीय चलन दाखवा, तुमच्याकडे कोणकोणत्या दराच्या नोटा आहेत, त्या कशा असतात ते आम्हाला पहायचे आहे, असे सांगत दोघांचाही विश्वास संपादन केला. त्यावरीन चव्हाण यांनी पेट्रोल विक्रीची जमा झालेली रोख रक्कम संबंधित व्यक्तीच्या हातात पाहण्यासाठी दिली.
त्यानंतर नोटा हातात घेवून तुमचे भारतीय चलन छान आहे, असे म्हणत चव्हाण यांनी दिलेली रोख रक्कम त्यांनी त्यांच्या पॅन्टच्या खिशात ठेवली आणि ते निघून गेले. त्याच दरम्यान चव्हाण यांचा सहकारी रमेश शिंदे तेथे आला आणि नंबर प्लेट नसलेल्या एका कारमधील व्यक्तीने माझ्याजवळ सुटे पैसे मागून हातचलाखीने माझ्याजवळील काही रक्कम लांबवली, अशी तक्रार करू लागला. त्यावेळी चव्हाण यांनी स्वतःच्या खिशात ठेवलेली रक्कम बाहेर काढून मोजून पाहिली असता, ती कमी असल्याचे आढळले.
दरम्यान, रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ड्युटी संपल्यानंतर दोघेही पंपाचे मालक प्रकाश ढमाले यांना हिशेब देत होते. त्यावेळी आयलेन्ट मीटर रिंडीगप्रमाणे जी रक्कम जमा झाली होती त्यापैकी १४,५०० रुपये रोख रक्कम कमी असल्याचे समजले. तसाच प्रकार रमेश शिंदे यांच्याबाबत देखील घडला होता. त्यांच्याकडील २०,५०० रूपये रोख रक्कम कमी असल्याचे आढळले.
चोरी झाल्याचे कळताच पंपमालक प्रकाश ढमाले यांच्यासह तिघांनी मिळून सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता, समजले की पांढऱ्या रंगाच्या होन्डा अमेज कारमधून आलेल्या त्या व्यक्तींनी हातचलाखी करून दोघांकडील मिळून ३५ हजार रूपयांची फसवणूक केली आहे. हातचलाखी करून फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात आरोपींविरूद्ध पौड पोलीस ठाण्यात तकार दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास पौड पोलीस करत आहेत.