यवत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची अंमलबजावणी १ जुलै २०२४ पासून सुरू झाली असून, दौंड तालुक्यात शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्या नेतृत्वाखाली चौफुला येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात महिलांसाठी मोफत नोंदणी व मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. मोफत नोंदणी उपक्रमात अल्पावधीतच हजारो महिलांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभाकरिता नोंदणी पूर्ण केली आहे. दौंड तालुक्यातील महिलांचा या योजनेच्या मोफत नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
दौंड तालुक्यात योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करिता शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्या कार्यालयात सुरु केलेल्या या नोंदणी केंद्रावर पासलकर स्वतः उपस्थित राहून महिलांना योजनेबाबत मार्गदर्शन करीत आहेत. यावेळी पासलकर यांनी सांगितले की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी ही योजना महत्त्वाची पायरी ठरणार असून, योजनेच्या अंतर्गत महिलांना दर महिन्याला मिळणाऱ्या १५०० रुपयांच्या निधीमुळे महिलांना कौशल्यविकासासाठी, मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे. योजनेचा लाभ घेण्याकरिता मोफत नोंदणी करून योजनेचा महिलांनी अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन महेश पासलकर यांनी यावेळी केले .