पुणे : पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्रे वाहून नेण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे (एसटी) ५०० बसची मागणी करण्यात आली आहे. या बसची देखभाल दुरुस्ती, नियोजन करण्यास एसटीकडून सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली. विधानसभा निवडणुकीसाठी मतदान यंत्रे वाहून नेण्यासाठी निवडणूक आयोगाकडून सरकारी बस ताब्यात घेतले जातात. त्यानुसार एसटी महामंडळाच्या ५०० आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ९६८ अशा एकूण १४६८ बस निवडणूक कामासाठी लागणार आहेत.
पुणे शहरातील कसबा, कोथरूड, शिवाजीनगर, खडकवासला, पर्वती, हडपसर, वडगाव शेरी, कॅन्टोमेंट व पिंपरी-चिंचवमधील चिंचवड, भोसरी आणि पिंपरी अशा ११ मतदारसंघांत पीएमपीकडून बस पुरविण्याची मागणी जिल्हा प्रशासनाने केली. यासाठी ९६८ बस मागविण्यात आल्या आहेत. या बसची देखभाल दुरुस्ती, नियोजन करण्यास पीएमपीकडून सुरुवात करण्यात आली आहे.
विधानसभा, लोकसभाच्या मतदानासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून मतदान यंत्रे वाहून नेण्यासाठी प्रत्येक वेळी बस पुरविण्यात येतात. त्यासाठी निवडणूक नियोजन अधिकारी मतदार केंद्रानुसार एसटीकडे किती बस लागतील, याची माहिती देतात. त्यानुसार एसटीकडून मतदान यंत्रे वाहून नेण्यासाठी मागणीनुसार बस पुरविल्या जातात. या वेळी विधानसभेचे मतदान एकाच टप्प्यात होणार आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, भोर-वेल्हा-मुळशी, मावळ, आंबेगाव, खेड, जुन्नर आणि शिरूर व इतर मतदारसंघांत एसटीकडून बस पुरविण्याची मागणी जिल्हा प्रशासनाने केली. विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
दोन दिवस बस लागणार
एसटीकडून मतदानाच्या अगोदरच्या दिवशी सकाळी मतदान यंत्रे वाहून नेण्यासाठी बस संबंधित मुख्य केंद्रावर जातील. त्या ठिकाणाहून मतदान यंत्रे घेऊन बस त्यांना दिलेल्या केंद्रावर मतपेट्या पोहोचवल्या जातील. एका बसमध्ये चार ते पाच मतदान केंद्राच्या पेट्या असतील. त्या पेट्या पोहचून आल्यानंतर बस पुन्हा मार्गावर जातील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मतदान संपायच्या अगोदर एक तास पुन्हा या बस मतदान यंत्रे गोळा करण्यासाठी त्यांना दिलेल्या केंद्रावर जातील. एखादी बस बंद पडली तर त्यासाठी राखीव बस देखील ठेवण्यात येणार आहेत.