पुणे: एसटी महामंडळात नव्याने बसेस दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे अॅल्युमिनियम बॉडी काढून माइल्ड स्टील बांधणी करण्यात येत आहे. मात्र, या पुनर्बाधणीत अजब कारभार झाल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओतून उघड झाले आहे. पुणे दापोडी विभागातील या बसमध्ये चालक स्वतः या चुकीची माहिती देत असून, यामध्ये चालक केबिनचा दरवाजा एकीकडे, केबिनमध्ये चढण्यासाठीच्या पायऱ्या दुसरीकडे असल्याचे सांगत आहे. ‘बघा मी बसमध्ये चढायचे कसे? मला न्याय द्या’, अशी मागणी या व्हिडीओतून चालक करत आहे.
एसटी महामंडळात अॅल्युमिनियम बॉडी काढून माइल्ड स्टील बांधणी करण्यात आलेल्या १० हजार बसेस सध्या राज्यभरात धावत आहेत. यामध्ये चेसीज जुनीच, पण वरील बॉडी नवीन बांधण्यात आली आहे. मात्र, ही बांधणी करताना चुकीच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली आहे. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये पुणे दापोडी विभागातील एसटी बस असून, चालक केबिनमध्ये चढण्यासाठी पायऱ्या आणि दरवाजा यातील अंतर जास्त असल्याचे सांगत आहे. आम्ही बस चालवण्यासाठी चढायचे कसे? असे सांगत चुकीच्या बांधणीची माहिती देताना प्रात्यक्षिक दाखवत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
दरम्यान, याबाबत एसटी महामंडळाशी संपर्क साधला असता, अशा प्रकारची एक अथवा दोन बसेस असू शकतात. आम्ही तपासणी करीत कार्यवाही करू, अशी माहिती महामंडळाकडून देण्यात आली.