MSEDCL पुणे : महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी (१ एप्रिलपासून) घरगुती ग्राहकांना तब्बल वीजदरात दहा टक्के वाढ करण्यास मंजुरी आहे. त्यामुळे सर्वसामान्याचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे. तर १ एप्रिल २०२४ पासून आणखी १७ टक्क्यांनी दरवाढ करण्यासही मंजुरी दिल्याने पुढील वर्षीचा दरवाढीचा ”शॉक” आताच दिला आहे.
घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिक आधिच हैराण झाला आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. तसेच पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील टोल आकारणीमध्ये १८ टक्के दरवाढी पाठोपाठ १ एप्रिलपासून सामान्य माणसांवर ही दुसरी दरवाढ लादली गेली आहे. यामुळे आता खर्चाचा मेळ कसा घालावा असा प्रश्न पडणार आहे.
सामान्य नागरिकांना मोठा धक्का…!
नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील जनतेला मोठा धक्का बसला आहे. शनिवारपासून वीजदर महाग झाले आहेत. याचा परिणाम प्रत्येक घरगुती ग्राहकांवर होणार आहे. आता दर महिन्याला त्यांना वीज वापरासाठी अधिक शुल्क भरावे लागणार आहे.
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने १ एप्रिलसपासून नवीन दर लागू केले आहेत. वीज वितरणच्या प्रामुख्याने चार कंपन्या आहेत. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड राज्य सरकारद्वारे चालवली जाते. ही महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची उपकंपनी आहे. ही कंपनी वीजदराची आकारणी करते. आधीच वीजबिलांच्या थकबाकीमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या महावितरणला वीजदरात वाढ केल्यामुळे काही अंशी दिलासा मिळण्याची शक्यता आहे