Mseb News लोणी काळभोर, ता. 26 : लोणी काळभोर परिसरातील लोणी कॉर्नर येथे कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे मोठा फटका बसला आहे. अज्ञात व्यक्तीने कचरा पेटवला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात असून या आगीत डीपीच्या (विद्युत वितरण यंत्रणेच्या) तारा जळून खाक झाल्या आहेत. परिणामी, मुख्य रस्त्यावरील २०० हून अधिक वीजजोडण्या अचानक बंद पडल्याने नागरिकांना तब्बल १० तास अंधारात राहावे लागणार आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, सकाळपासूनच वीजपुरवठा खंडित झाल्याने घरगुती कामे, व्यावसायिक व्यवहार आणि लहान उद्योगांवर मोठा परिणाम झाला आहे. उन्हाच्या पार्श्वभूमीवर वीज नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. Mseb News

प्राथमिक माहितीनुसार, डीपीच्या चार केबल पूर्णपणे जळाल्या असून यामुळे मोठे नुकसान झाले आहे. तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून कर्मचारी युद्धपातळीवर काम करत आहेत. वीजपुरवठा सायंकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत पूर्ववत होण्याची शक्यता वर्तवली जात असली, तरी त्याआधीच पुरवठा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे. Mseb News

दरम्यान, “कचरा जाळण्याच्या निष्काळजी प्रकारांमुळेच अशा घटना घडत आहेत,” असा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे. संबंधित अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, तसेच अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही जोर धरत आहे. Mseb News







