-संदीप टूले
केडगाव : सध्या राज्यात तुतारी ची मोठी हवा आहे. त्यामुळे सध्या वातावरण पाहता ज्याला त्याला तुतारी फुंकणारा माणूस या चिन्हावर लढायचे आहे. त्यामुळे अनेकजण ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज करत आहेत.
यात दौंड तालुकाही मागे नसून दौंड तालुक्यातूनही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र ही संख्या वाढत असताना माजी आमदार रमेश थोरात यांच्या समर्थकांनीही रमेश थोरात यांनी तुतारी चिन्हावर लढावे अशी जोरदार मागणी करत आहे. तरी त्यांचा अर्ज राष्ट्रवादी काँगेस (शरद पवार गट) या पक्षाकडे आला नसल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी पाटस येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माजी आमदार रमेश थोरात यांचा अर्ज आल्यास इतरांप्रमाणे त्यांच्याही अर्जाचा विचार करू असे म्हणाले आहे. खासदार सुळे यांच्या या विधानावरून आमदार रमेश थोरात यांच्या समर्थकांनी मात्र नवंचैतन्य मिळाले असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
कारण मागील तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस( शरद पवार गट ) यांच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली होती त्यात दौंडच्या काही नेते मंडळींनी कार्यकर्त्यांना असे सांगितले होते की, पक्षाकडून बाहेरचा उमेदवार देणार नाही असा शब्द देण्यात आला आहे. त्यामुळे उमेदवार हा आपल्यातीलच आहे. या बैठकीत नंतर मात्र रमेश थोरात समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थ निर्माण झाली होती. कारण दौंड चे आमदार राहुल कुल यांना टक्कर देण्यासाठी तुतारी चिन्ह मिळणे फार गरजेचे आहे.
दौंडमध्ये तुतारी च्या बाबतीत मतदार संघात सहानभुतीची लाट आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून उमेदवारी नाही मिळाली तर माजी आमदार रमेश थोरात यांना निवडणूक लढण्यासाठी अपक्ष लढणे हाच पर्याय असल्याने समर्थक काहीशे नाराज झाले होते. पण पाटस येथील खासदार सुप्रिया सुळे यांच्या विधानाने रमेश थोरात यांच्या कार्यकर्त्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहे.