बारामती : देशात निवडणुकांचे अनेक सर्वे येत जात असतात. त्यामुळे आपण जास्त आनंदी व्हायचं नाही आणि दु:खी व्हायचं नाही. आपला हा खेळ शांतपणे खेळायचा असतो, कॅप्टन कूल धोनीसारखा, असं सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. सध्या राज्यासह संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या भुवया उंचावल्या असल्याचं पाहायला मिळंत आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदार बच्चू कडू आणि शरद पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली, याबाबत देखील भाष्य केले आहे. यावर बोलताना त्यांनी म्हटलं, जर ती चर्चा बंददाराआड झाली असेल तर ते मला कसं कळेल. अपात्रतेचा निर्णय काय होईल? त्यावर पुढची भूमिका ठरवू, असं सुळे यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक दौऱ्यावर येणार आहेत, यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, अतिथी देवो भव. त्यांचे नाशिकमध्ये स्वागत आहे. नाशिकमध्ये आल्यावर शेतकऱ्यांचे कांद्याचे दुःख त्यांच्यापर्यत नक्की पोहोचेल. त्यांनी निर्यात बंदीवर चुकीचा निर्णय घेतला, त्यावर फेरविचार करावा अशी मागणी देखील यावेळी सुळे यांनी केली.