पुणे : राज्यातील इतर पाणी योजना सुरू असून त्यांच्यासाठी सरकारकडे पैसा आहे. मात्र, निरा-देवधरसाठी सरकारकडे पैसा नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे, असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही योजना रद्द करण्याचा निर्णय या योजनेवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असून याविरोधात भविष्यात जनप्रक्षोभाला सामोरे जावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत निधी नसेल, तर अन्य योजना कशा पूर्ण करणार आहात, याचे उत्तर द्या. असं सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
राज्यातील कृष्णा-कोयना, म्हैशाळ-जत, सुलवाडे-जामफळ-कनोली, -टेंभू, गोदावरी विकास महामंडळ औरंगाबाद, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगांव व विदर्भ विकास महामंडळ नागपूर या उपसा सिंचन योजना आणि विकास महामंडळांची कामे जर विना तक्रार सुरू असतील. तर केवळ निरा-देवधर योजनेलाच निधी का नाही, असा खडा सवाल करत सुळे यांनी या सर्व योजनांच्या खर्चाची आकडेवारीसहित जंत्रीच आपल्या पत्रातून सादर केली आहे.
शासनाने निरा देवधर योजनेच्या निविदेचे मंजूरीचे काम बंद केले आहे. निधीअभावी हा प्रकल्प रद्द करत असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात येत आहे. असे करणे योग्य नसून कृष्णा-कोयना-उपसा सिंचन योजना म्हैसाळ-जत व सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजना, टेंभू उपसा सिंचन प्रकल्पा अंतर्गत विविध उपसा सिंचन योजना सांगली आणि सातारा जिल्ह्यासह अन्य महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाकरीता जितक्या महत्वाच्या आहेत तितकीच निरा-देवधर योजना सुद्धा महत्वाची आहे, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटल आहे.
शेतकऱ्यांच्या फायद्याची कोणतीच योजना निधी अभावी रद्द करू नये अशीच आमची भूमीका आहे. मात्र निधी अभावी जर निरा देवधर प्रकल्प बंद करण्याचा प्रयत्न जाणीवपुर्वक होत असेल, तर ही अतिशय खेदजनक बाब आहे. एकीकडे निरा देवधर योजना बंद करण्याचे ठरवले जात असतांना महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधे नवीन सिंचन योजना सुरू करण्याचा प्रयत्न होत आहे. जर निधी अभावी एक योजना बंद करावी लागते आहे, तर इतर योजनांना निधी कसा उपलब्ध होणार आहे, याचे उत्तर मिळायला हवे, असं सुप्रिया सुळे यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे.