युनूस तांबोळी
शिरूर, (पुणे) : समाजातील वेगवेगळ्या पारंपारिक अंधश्रद्धा व चुकीच्या समजूतीने स्त्री पुरूष विषमता निर्माण झाली आहे. त्यामुळे समाजात वावरताना स्त्रीयांना समान वागणूक देताना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. खरे तर कोणतीही समस्या असल्यास सर्वप्रथम तुमच्या आई-बाबांना सांगा, सध्या आई आणि मुलीमधील संवाद हा कमी होत चालला आहे. मोबाईलचा वापर चांगल्या कामासाठी करा. आश्रम व वृद्धाश्रमाची कुटूंबात मानसिकता वाढू लागली आहे. मुलगी तिच्या आई सारखे वागण्याचा प्रयत्न करत असते. आई खंबीर असेल तर मुलगी ही खंबीर होते. तिच्यामध्ये आत्मविश्वास वाढतो. मुलींनो तुम्ही खूप शिका स्वतःच्या पायावर उभे रहा. पण भारतीय संस्कृती सोडू नका. असे मत तेजस्वीनी फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली चव्हाण यांनी व्यक्त केले.
शिरूर तालुक्यातील कोंढापूरी येथे आर. एम. धारिवाल सिंहगड मॅनेजमेंट स्कूल च्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. उस्मानाबाद च्या सामर्थ्य फाउंडेशन अध्यक्ष रंजीता पवार, उद्योजिका कविता खैरनार, उद्योजिका तनुजा लगड आणि उद्योजिका मोनाली काकडे या उपस्थित होत्या.
रंजीता पवार म्हणाल्या की, महिला या सर्व क्षेत्रात पुढे आहे . परंतु अर्थशास्त्राचे ज्ञानही महिलांनी घ्यायला हवे. तुम्ही विमा पॉलिसी काढा. जीवन सुरक्षित करा. महिला या कमवतात पण आपण गुंतवणूक कशी आणि कुठे करायची हे त्यांना माहीत नसते, म्हणून अर्थ साक्षर होणे गरजेचे आहे.
आर एम धारिवाल सिंहगड मॅनेजमेंटच्या संचालिका डॉ.अनिता माने यांनी प्रमुख पाहुणे आणि सर्व महिला कर्मचाऱ्यांच्या सत्कार केला.
या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. योगेश भोवटे, डॉ. सुनील उजागरे व डॉ. झेड. एस. मुल्ला यांनी केले. विद्यार्थी व शिक्षक यांनी भाषणे सादर केली. डॉ. चारुलता कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.