पुणे : सर्वसामान्यांसाठी रोजच्या नाश्त्यात असणाऱ्या पोह्यांच्या दरात वाढ झाली आहे. पोहे, भाजके पोहे, दगडी पोहे, पातळ पोह्यांच्या दरात वाढ झाली आहे. किलोमागे सरासरी तीन ते पाच रुपयांनी वाढ झाली आहे. कच्च्या मालाच्या तुटवडय़ामुळे दरवाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली .यामुळे सर्वसामान्यांना सकाळचा नाश्ता आता महागणार असल्याचे चित्र आहे.
घाऊक बाजारात पोह्यांच्या क्विंटलच्या दरात २०० ते ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात पोह्यांच्या दरात किलोमागे तीन ते पाच रुपयांनी वाढ झाली आहे. मध्यंतरी तांदळाची निर्यात बंद करण्यात आली होती. केंद्र शासनाने तांदळावरील निर्यात बंदी मागे घेतली आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या तांदळाची निर्यात मोठय़ा प्रमाणावर करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या साळीचा तुटवडा जाणवत आहे.
दरम्यान, पोह्याला ग्राहकांकडून बारा महिने मागणी असते. साळीचे भाव वाढल्याने पोह्यांवर प्रक्रिया करणाऱ्या मिलचालकांनी दरात वाढ केली आहे. उत्पादन खर्चात वाढ झाल्याने मिलचालकांनी दरात वाढ केली आहे. घाऊक आणि बाजारात पोह्यांच्या दरात वाढ झाली आहे. जोपर्यंत साळीचे दर कमी होणार नाहीत. तोपर्यंत पोह्यांचे दर तेजीत राहतील, अशी माहिती देखील व्यापाऱ्यांनी दिली आहे.