गोरख जाधव
डोर्लेवाडी, (पुणे) : डोर्लेवाडी (ता. बारामती) ग्रामपंचायत हद्दीत शनिवारी (ता. 18) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास चार ते पाच कुत्र्यांच्या कळपाने केलेल्या हल्ल्यामध्ये एका माकडाचा मृत्यू झाला. कुत्र्यांच्या या कळपाने रस्ता पार करणाऱ्या माकडावर हल्ला केला. त्यात जखमी झालेल्या माकडावर उपचार व्हावेत, या उद्देशाने या परिसरातील नागरिकांनी याबाबत पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत काळभोर यांना फोनवरून माहिती दिली. त्यानंतर तपासणी करून उपचार सुरु केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉ. काळभोर यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, डोर्लेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील महादेव मंदिराशेजारी शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या एक माकड रत्याच्या बाजूने निघाले होते. यावेळी परिसरात असलेल्या भटक्या कुत्र्यांच्या कळपाने माकडावर थेट हल्ला चढवला. यावेळी याच परिसरात राहणारे प्राणी मित्र बाळासाहेब साळुंके यांना त्याची माहिती मिळाली व त्यांनी त्या माकडाला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवले.
यावेळी रहिवाशी मृणाल बोराटे या मुलीने व परिसरातील काही नागरिकांनी वनविभागाचे अधिकारी बाळासाहेब गोलांडे यांना वारंवार फोन केला. मात्र, त्यांनी फोन उचलला नाही. तर वनपाल अधिकारी हेमंत मोरे यांच्याशी संपर्क साधला असता ते रेस्क्यू टीम घेऊन त्या ठिकाणी पोहोचले. मात्र, उपचारापूर्वीच माकडाचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, जर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळेवर नागरिकांचे फोन उचलले असते, तर त्या माकडाचा जीव वाचण्याची शक्यता होती. बारामतीचे वनरक्षक अधिकारी बाळासाहेब गोलांडे यांना फोन करून नागरिक वैतागून गेले. सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत तब्बल दोन तास नागरिक त्यांना फोन करत होते. परंतु, फोन उचलला गेला नाही. वनरक्षक अधिकारी बाळासाहेब गोलांडे यांच्या भोंगळ कारभारामुळे या माकडाचा जीव गेला असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे. या अशा अधिकाऱ्यांवर वनविभाग काय कारवाई करणार? याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
अधिकारी राहायला ५ किलोमीटर, यायला दीड तास..
या ठिकाणी असलेल्या एका नागरिकाने उशीर झाल्याबाबत एका लोंढे नावाच्या अधिकाऱ्याला जाब विचारला असता अधिकारी म्हणाले, आम्हाला काय जवळून यायचं आहे का? असे उत्तर दिले. नागरिकाने कुठे राहता? असे विचारले असता डोर्लेवाडीपासून साडेचार ते पाच किलोमीटर अंतरावरील मळद या ठिकाणी राहत असल्याचे सांगितले. जर अधिकाऱ्याला ५ किलोमीटर येण्यासाठी दीड तास लागत असेल, तर त्यांना घटनेचे किती गांभीर्य आहे, यावरून लक्षात येते. अशा अधिकाऱ्यांवर संबंधित विभाग काय कारवाई करणार? याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
याबाबत बोलताना स्थानिक नागरिक मृणाल बोराटे म्हणाली, “वारंवार फोन करूनसुद्धा निगरगट्ट अधिकाऱ्यानी फोन उचलले नाहीत. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांना सदर अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी निवेदन देणार आहे.
याबाबत बोलाताना प्राणी मित्र बाळासाहेब साळुंके म्हणाले, “वनरक्षक अधिकारी बाळासाहेब गोलांडे यांना वारंवार फोन केला.मात्र, फोन उचलला नाही. जर ते वेळेवर आले असते तर माकडाचा जीव वाचला असता. घटनेचे गांभीर्य नसणाऱ्या अशा अधिकाऱ्यांवर वरीष्ठांनी कारवाई करावी.