उरुळी कांचन (पुणे) : महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून विनयभंग व घरातील व्यक्तींना मारहाण केल्याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात ५ जणांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रयागधाम परिसरात मंगळवारी (ता. ३०) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
नन्या मांजरे (वय – ४०), ओंकार मांजरे, अजय पवार, सुरज जाधव, अनष मांजरे (रा. सर्वजण जय मल्हार रोड, उरूळी कांचन, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ५ जणांची नावे आहेत. या प्रकरणी एका २२ वर्षीय महिलेने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. ३०) नन्या मांजरे संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास महिला राहत असलेल्या ठिकाणी रिक्षा घेऊन गेला होता. त्याच्याजवळ असलेली रिक्षा त्याने घराजवळ लावून फिर्यादी यांच्या घरात शिरला. यावेळी त्याने महिलेला लज्जा उत्पन्न होईल, असे असभ्य वर्तन केले.
दरम्यान, घरातून बाहेत येऊन त्याने त्याचे मित्र ओंकार मांजरे, अजय पवार, सुरज जाधव, अनष मांजरे यांना फोन करून बोलावून घेतले. व त्यांनी घरातील व्यक्तींना व घरी आलेले ओळखीचे लोकांना दगड फेकून जखमी केले. या प्रकरणी २२ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार ५ जणांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव हे करीत आहेत.